Wed, Nov 21, 2018 21:25होमपेज › Kolhapur › ‘एलईडी’ने दरसाल 282 कोटी युनिट वीज बचत

‘एलईडी’ने दरसाल 282 कोटी युनिट वीज बचत

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 1:16AMकोल्हापूर : सुनील सकटे 

केंद्र  सरकार  आणि राज्य सरकारतर्फे ऊर्जा बचतीसाठी राबविण्यात येणार्‍या एलईडी उपकरणांच्या माध्यमातून देशात, मोठ्या प्रमाणात विजेची आणि कोट्यवधी रुपयांची बचत होत आहे. एलईडी बल्बच्या माध्यमातून राज्यात दरवर्षी 280 कोटी 87 लाख 32 हजार युनिट आणि एलईडी ट्यूबद्वारे राज्यात दरवर्षी 41 लाख दोन हजार 658 युनिटची तसेच फॅनद्वारे दररोज राज्यात साडेतीन हजार युनिट वीज बचत होत आहे. वातावरणात मिसळणार्‍या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणही कमी होण्यास मदत होत आहे. 

महाराष्ट्र शासन आणि एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ऊर्जा कार्यक्षम इमारत कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 121 पैकी आतापर्यंत साठहून अधिक इमारतीत अशी साधने बसविण्यात आली आहेत. सरकारी यंत्रणेसह खासगी ग्राहकांनाही अशा उपकरणांचा वापर करून वीज बचतीचा मार्ग स्वीकारावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घरगुती ग्राहकांनाही एलईडी बल्ब, ट्यूबलाईट आणि फॅन पुरविण्यात येत आहेत. 

18 जानेवारी रात्री आठच्या आकडेवारीनुसार देशात 28 कोटी 50 लाख 60 हजार 591 एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात दोन कोटी 16 लाख 27 हजार 754 बल्ब बसविण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 12 लाख 53 हजार 26 बल्ब बसविण्यात आले आहेत. बल्बच्या माध्यमातून राज्यात प्रतिवर्षी 280 कोटी 87 लाख 32 हजार युनिट वीज बचत होत आहे. तर प्रतिवर्षी होणारा विजेवरील 1123 कोटी रुपयांची बचत होत आहे. अतिमागणीवेळी लागणारी तब्बल 562 मेगावॅट विजेची बचत होण्यास मदत होत आहे. उत्सर्जनाच्या माध्यमातून हवेत मिसळणार्‍या 22,75,013 टन इतका कार्बन डायऑक्साईड रोखण्यात यश येत आहे. 

देशात 47,48,740,  राज्यात 93,666 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 3978 एलईडी ट्यूबलाईट बसविण्यात आल्या आहेत. या ट्यूबच्या माध्यमातून दरवर्षी 41,02,658 युनिट विजेची बचत होत आहे. तर एक कोटी 39 लाख 49 हजार 39 रुपयांची दरवर्षी बचत होत आहे. ऐन मागणीच्या वेळेत दोन मेगावॅट विजेची मागणी टाळण्यास हातभार लागत आहे. देशात 14,78,560, राज्यात 8,643 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 73 एलईडी फॅन बसविण्यात आले आहेत. यामुळे दररोज 3349 युनिट वाचते. बल्बमुळे प्रतिवर्षी 22 लाख हजार 13 टन, ट्यूबमुळे 3,364 टन कार्बन डायऑक्साईचे उत्सर्जन थांबते. राज्यात आजही अनेक घरात अशी उपकरणे वापरण्यास वाव आहे. सर्वच ग्राहकांनी या उपकरणांचा वापर केल्यास वीज बचतीसह आर्थिक आणि पर्यारवणीय बचत होण्यास मदत होणार आहे.