Wed, Jun 26, 2019 12:00होमपेज › Kolhapur › कुरूंदकर, घनवट पदोन्‍नतीच्या यादीत

कुरूंदकर, घनवट पदोन्‍नतीच्या यादीत

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 30 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावरून पोलिस उपअधीक्षक पदावरील पदोन्‍नतीसाठी गृहविभागाकडून जाहीर चारशेवर पोलिस अधिकार्‍यांच्या यादीत खून, चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यात अटक झालेल्या काही अधिकार्‍यांचा समावेश आहे. महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे-गोरे खुनातील संशयित अभय कुरूंदकर, वारणा चोरीतील संशयित विश्‍वनाथ घनवटच्या नावाचा समावेश करण्यात आल्याने कोल्हापूर, सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

गंभीर गुन्ह्यात अटक होऊन सद्यस्थितीत कारागृहात असलेल्या अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई होऊनही पदोन्‍नतीच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
अश्‍विनी बिद्रे-गोरे यांचे पती राजू गोरे यांच्यासह कुटुंबीयांनी या वृत्तावर संताप व्यक्‍त केला आहे. अभय कुरूंदकर याला खुनाच्या गुन्ह्यातून वाचविण्याचा अद्यापही खटाटोप चालू आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पत्नीच्या खुन्याला पदोन्‍नतीचा प्रयत्न झाल्यास कोणत्याही क्षणी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा त्यांनी इशारा दिला.

राज्यातील चारशेवर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पोलिस उपअधीक्षक पदावर पदोन्‍नती देण्यात येणार आहे.त्यामुळे संबंधितांची चौकशी करून पोलिस महासंचालक कार्यालयाला तपशीलवार माहिती देण्याचे आदेश आस्थापना विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी गुरुवारी (दि. 28 जून) दिले आहेत.

अप्पर पोलिस महासंचालकांनी सोबत दिलेल्या यादीत ठाणे शहर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर, सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निलंबित पोलिस अधिकारी विश्‍वनाथ घनवट यांच्या नावाचा समावेश आहे. 

मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील महिला पोलिस अधिकारी अश्‍विनी बिद्रे-गोरे यांचा अमानुष खून करून मृतदेहाचे तुकडे मीरा-भाईंदर खाडीत फेकून दिले होते. दि. 11 एप्रिल 2016 मध्ये ही घटना घडली होती. नवी मुंबई पोलिसांनी संशयित कुरूंदकरसह त्याच्या साथीदारांना दि. 7 डिसेंबर 2017 मध्ये अटक केली होती.
वारणानगर (ता. पन्हाळा) येथील 9 कोटी 18 लाखांच्या चोरीप्रकरणी सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषणचा तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवटसह सात पोलिसांना ‘सीआयडी’ने अटक केली होती. गंभीर गुन्ह्यातील संशयितांची कारागृहात रवानगी झाली आहे.
कुरूंदकर, घनवट यांच्या कृत्यामुळे पोलिस यंत्रणेच्या विश्‍वासार्हतेचा मुद्दा उपस्थित झाला होता. तरही पदोन्‍नतीच्या संभाव्य यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाल्याने पोलिस दलातूनच आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

पदोन्‍नती दिलीच नाही...

मुंबई : निलंबित पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर यांना कोणतीही पदोन्‍नती दिली नसल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाच्या वतीने दिली. सहायक पोलिस आयुक्‍तांच्या पदोन्‍नतीसाठी पहिल्या चारशे अधिकार्‍यांची माहिती मागविण्यात आली होती. या यादीत कुरूंदकर यांचे नाव समाविष्ट आहे. त्याचा अर्थ त्यांना पदोन्‍नती दिली, असा होत नसल्याचे व्हटकर यांनी स्पष्ट केले आहे.

सहायक पोलिस आयुक्‍तपदाच्या पदोन्‍नतीसाठी नियमाप्रमाणे पोलिस निरीक्षकपदाच्या एक जानेवारी 2018 च्या सेवाज्येष्ठता यादीतील पहिल्या 400 अधिकार्‍यांची सद्यस्थितीची म्हणजे त्यांचे गोपनीय अहवाल, दाखल गुन्हे, विभागीय चौकशी व इतर सेवा विषयक बाबींची माहिती मागविण्यात आली आहे. त्याप्रमाणे कुरूंदकर यांचे नावही या चारशे जणांच्या यादीत आहे. याचा अर्थ कुरूंदकर यांना पदोन्‍नती दिली, असा होत नाही. फक्‍त माहिती मागविण्यात आली असून, अद्याप निवड सूची तयार करण्यात आलेली नाही किंवा पदोन्‍नतीबाबत अद्याप विचारही केलेला नाही, असे व्हटकर यांनी सांगितले.