Mon, Aug 19, 2019 01:10होमपेज › Kolhapur › कसबा बावड्यात साकारणार कृषिभवन

कसबा बावड्यात साकारणार कृषिभवन

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 1:32AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील सकटे 

शहरात महसूल विभागाचे स्वराज्य भवन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बांधकाम भवन साकारले असून आता कृषी विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी कृषिभवन साकारणार आहे. कसबा बावड्यातील शासकीय कृषी-तंत्र विद्यालयाच्या जागेत ही इमारत बांधण्याचे नियोजन आहे. 

शासकीय खात्यांची  कार्यालये विविध भागात कार्यरत आहेत. एकाच खात्याची कार्यालये एकत्रित करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्याचाच भाग म्हणून सर्व न्यायालये एकत्र करून न्यायसंकुल इमारत साकारली आहे.  

महसूलसाठी स्वराज्य भवन साकारले. सा. बां. साठी बांधकाम भवन साकारणार आहे. याच धर्तीवर कृषी विभागाची कार्यालये एकत्र करून कृषिभवन बांधण्याचे नियोजन आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तांदूळ महोत्सवावेळी कृषिभवन साकारण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर यंत्रणा कार्यरत झाली आहे. शहरात कृषी विभागाची एकूण नऊ कार्यालये कार्यरत आहेत. यापैकी सहा कार्यालये भाड्याच्या जागेत असून त्याचा दरवर्षीचा खर्च 51 लाख, 65 हजार 711 रुपये आहे. हा खर्च वाचविण्यासाठी सर्वच कार्यालये एकत्रित करून कृषिभवन संकल्पना राबविण्यात येत आहे. 

कृषी विभागाची कार्यालये, कंसात लागणारी जागा पुढीलप्रमाणे : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय (6881 चौ. फू.), जिल्हा अधीक्षक कृषी (3278 चौ.फू.), प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर (3278 चौ. फु.), उपविभागीय कृषी अधिकारी कोल्हापूर (1408 चौ.फू.), उपविभागीय कृषी अधिकारी करवीर (1199 चौ. फू.), मंडळ कृषी अधिकारी करवीर (495 चौ. फू.), जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा (3000 चौ. फू.), रासायनिक खत पृथ्थकरण प्रयोगशाळा (3000 चौ. फू.), किटकनाशके पृथ्थकरण प्रयोगशाळा (प्रस्तावित ) (3000 चौ. फू.),  मीटिंग हॉल (1200 चौ. फू.), अशी एकूण 28500 चौ. फू. जागा अपेक्षित आहे.   

कसबा बावडा येथील शासकीय कृषी तंत्र विद्यालयाची गट क्रमांक 953 चाळीसठाणा येथील वसतिगृह इमारत (16110 चौ. फू.) व रिकामी जागा (18292 चौ. फू.) अशी एकूण 34402 चौ. फू.  जागा  जिल्हा अधीक्षक कृषी  व  प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर यांच्या कार्यालयासाठी 99 वर्षे कराराने भाडेपट्ट्याने घेतली आहे. कृषी भवनसाठी ढोबळ अंदाजपत्रक आणि नकाशे तयार करण्याची विनंती विभागी कृषी सहसंचालक कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागास केली आहे.