Wed, Jul 17, 2019 20:06होमपेज › Kolhapur › भक्तिभावात रंगला अंबाबाईचा रथोत्सव(व्हिडिओ)

भक्तिभावात रंगला अंबाबाईचा रथोत्सव(व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा अपूर्व उत्साह आणि भक्तिभावात रविवारी रात्री रंगला. फुलांच्या पायघड्या, सप्तरंगी रांगोळ्या, नयनमनोहरी आतषबाजी, रोषणाईने उजळलेला मार्ग, पारंपरिक लवाजमा असा रथोत्सवाचा चैतन्यदायी आणि पारंपरिक थाट भाविकांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवला. सजवलेल्या रथात विराजमान झालेल्या श्री अंबाबाईच्या दर्शनाने भाविक भक्तिरसात न्हाऊन गेले.

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या रथोत्सवाचा मार्ग सायंकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने फुलला होता. रात्री साडेनऊ वाजता मंदिरात तोफ झाली आणि श्री अंबाबाई रथावर स्वार होऊन नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजवलेल्या चांदीच्या रथात श्री अंबाबाईची मूर्ती ठेवण्यात आली होती. आ. राजेश क्षीरसागर, सौ. वैशाली क्षीरसागर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, प्रमोद पाटील, संगीता खाडे, सचिव विजय पोवार आदींच्या उपस्थितीत रथोत्सवाला प्रारंभ झाला.

श्री अंबाबाईच्या दर्शनाची आस घेऊन रथोत्सव मार्गाच्या दुतर्फा थांबलेल्या भाविकांचा उत्साह क्षणाक्षणाला वाढतच होता. रथ जसजसा जवळ येईल, तसतशी अंबामातेच्या दर्शनाची ओढ वाढत जात होती. श्री अंबाबाईचे दर्शन होताच, फुलांचा वर्षाव करत, ‘अंबा माता की जय’चा गजर करत, भाविक देवीपुढे नतमस्तक होत होते. देवीचे औक्षण केले जात होते. 

देवीच्या दर्शनानंतर भाविकांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव दिसत होते. भाविक मोठ्या श्रद्धेने देवीचा रथ ओढत होते. रथ जसा पुढे जात होता, तसे भाविकही पुढे जात होते. यामुळे रथोत्सव मार्गावर उत्साह ओसंडून वाहत होता. पारंपरिक बँडच्या तालावर श्री अंबाबाईची गीते सादर केली जात होती. बँडमागे पारंपरिक लवाजमा होता. आकर्षक लाईट्स इफेक्टस्नी रथोत्सवाचा मार्ग अक्षरश: उजळून गेला होता. विविध संस्था, संघटनांच्या वतीने रथाचे स्वागत करत आतषबाजी केली जात होती. 

भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात रथ आल्यानंतर आरती झाली. यानंतर रथ बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिर रस्त्यावर आला. तेथून पुन्हा महाद्वार रोडमार्गे रथ अंबाबाई मंदिरात आला. यानंतर मंदिर प्रदक्षिणा झाली आणि रथोत्सवाची जल्लोषी आणि चैतन्यदायी वातावरणातच सांगता झाली.

परंपरा आणि प्रबोधनाच्या रांगोळ्या
रथोत्सव मार्गावर सप्तरंगी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. आकर्षक रंगांची मांडणी आणि कलाकुसर पाहताना भाविकांचे भान हरपून जात होते. त्याचबरोबर ‘जल है तो कल है’, ‘मुलगा वंशाचा दिवा आहे, तर मुलगी त्याच दिव्याची वात आहे’, ‘व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकच्या वापराने तरुणाई कशाला बरबाद करता’, ‘कोल्हापुरी लई भारी’, ‘पंचगंगा आणि रंकाळा वाचवू या’ असे अनेक संदेश देत रांगोळ्यांतून परंपरेबरोबर प्रबोधनही करण्यात आले होते. मूकबधीर महिला मंडळाच्या चार महिलांनी रेखाटलेली रांगोळी लक्षवेधी ठरत होती.

रथावर पाचच श्रीपूजक
दरवेळी रथावर श्रीपूजकांची संख्या अधिक असते. यामुळे रथात विराजमान झालेल्या देवीचे अनेक भाविकांना दर्शनच होत नव्हते. ही बाब सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर देवस्थान समितीने रथावर पाचच श्रीपूजक थांबण्याची सूचना केली होती. त्यानुसार रथावर केवळ पाचच श्रीपूजक होते. यामुळे देवीचे दर्शन सहजपणे होत होते. भाविकांतून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत होते.

रथोत्सव मार्गावर विविध संस्था संघटनांच्या वतीने प्रसाद, पाणी वाटप करण्यात येत होते. महालक्ष्मी आध्यात्मिक सेवा संघाच्या वतीने साखर-फुटाणे हा देवीचा पारंपरिक प्रसाद वाटप करण्यात येत होता.

अजित पवार यांनी रथ ओढला...
महाद्वार, महाद्वार रोड, गुजरी कॉर्नरमार्गे रथ भाऊसिंगजी रोडवर आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी काही अंतर अंबाबाईचा रथ ओढला. यानंतर पवार म्हणाले, महाराष्ट्रात अस्वस्थता आहे. राज्य सरकारचा बेजबाबदारपणे आणि चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू आहे. त्याबाबत आता लोकही बोलू लागले आहेत. सरकारच्या मंत्र्यांची भाषणे सुरू झाली की, लोक आता विरोध करू लागले आहेत. राज्यातील अस्वस्थता संपू दे, शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराने पुढे जाऊ दे, असे अंबाबाई चरणी साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर.के. पोवार, भैया माने, आदिल फरास, रोहित पाटील, जयकुमार शिंदे, महेश जाधव आदीही रथोत्सवात सहभागी झाले होते.

Tags : kolhapur district,  Ambabais Rathhotsav  


  •