Sun, Aug 25, 2019 12:18होमपेज › Kolhapur › कृष्णा, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी इंग्लंडमधील तज्ज्ञांची मदत घेणार : रामदास कदम 

कृष्णा, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी इंग्लंडमधील तज्ज्ञांची मदत घेणार : रामदास कदम 

Published On: Jul 03 2018 1:52AM | Last Updated: Jul 03 2018 12:32AMनृसिंहवाडी : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्याला नद्या प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी आधुनिक उपाययोजनेबरोबच साधनांचा वापर करण्यात येईल. त्यासाठी इंग्लंडमधून खास तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात येईल. या तालुक्यात रोगराईचा प्रश्‍न गंभीर आहे. तालुका प्रदूषणमुक्त झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही, असे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले.

मंत्री कदम हे क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी आले असता पत्रकारांशी  बोलत होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे नृसिंहवाडी येथे आगमन झाले. हलगी व फटाक्यांच्या गजरात शिवसेना नृसिंहवाडी शाखेतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. उल्हास पाटील, तालुका अध्यक्ष सतीश मलमे, नियोजन मंडळ सदस्य मधुकर पाटील आदी मान्यवर होते.

येथील दत्त देव संस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री कदम  म्हणाले,  पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या प्रदूषण मुक्तीबाबत आधुनिक साधनांचा वापर करण्यासाठी व तो प्रश्‍न कायमचा सुटण्यासाठी इंग्लंडमधून खास तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात येईल. 

ते म्हणाले, तालुक्यातील रोगराईचा प्रश्‍न गंभीर असून, त्याबाबत योग्य उपाययोजना व नियोजन झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शिरोळ तालुक्यातील व मुख्य शहरातील सांडपाणी समस्या लवकर सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट केले.यावेळी माजी अध्यक्ष शशिकांत बड्ड पुजारी, संजय ऊर्फ सोनू पुजारी, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, कमरूद्दीन पटेल, प्रदीप धनवडे, मिलिंद पुजारी आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.