Sun, Apr 21, 2019 00:01होमपेज › Kolhapur › शिल्‍पकलेचा अप्रतिम नमुना : खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर 

शिल्‍पकलेचा अप्रतिम नमुना : खिद्रापूरचे कोपेश्‍वर मंदिर 

Published On: Aug 16 2018 8:09AM | Last Updated: Aug 16 2018 11:31AMस्‍वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन 

शिरोळ तालुक्‍यातील खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्‍वर मंदिर. चालुक्‍य शिल्‍प स्‍थापत्‍यशैली दर्शन यातून घडते. मंदिर सद्‍यस्‍थितीत सुस्‍थितीत असले तरी पावसाळ्‍यात या मंदिरातील पडझड झालेल्‍या स्‍तंभांना, कमानीला धोका पोहोचण्‍याची शक्‍यता आहे. कलेचा अप्रतिम नमुना असलेल्‍या मंदिराचे संरक्षण, संवर्धन अपरिहार्य बनले आहे. त्‍यामुळे पर्यटन विभागाने या परिसराच्‍या विकासाकडे लक्ष देण्‍याची तर पुरातत्‍व विभागाने या मंदिराची देखभाल करण्‍याची आवश्‍यकता आहे. 

Image result for khidrapur

कोपेश्‍वर मंदिराला केंद्रीय पुरातत्‍व विभागाने २ जानेवारी १९५४ रोजी महाराष्‍ट्रातील राष्‍ट्रीय संरक्षित स्‍मारक म्‍हणून घोषित केले. कोपेश्‍वर मंदिर अप्रतिम स्‍थापत्‍यशैलीसाठी प्रसिध्‍द आहे. बेसॉल्‍ट आणि ग्‍लास पॉलिशिंग केल्‍याप्रमाणे या मंदिराचे बांधकाम आहे. पावसाळ्‍यात ऊबदारपणा आणि उन्‍हाळ्‍यात गारवा टिकून राहावा, त्‍यादृष्‍टीने तत्‍कालीन स्‍थापत्‍य विशारदांनी केलेला प्रयत्‍न येथे दिसून येतो. 

कोपेश्‍वर मंदिराची वैशिष्‍ट्‍ये

या मंदिराचे वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे गजपट्‍ट असणारे हे भारतातील एकमेव मंदिर आहे. 

उत्‍कृष्‍ट शिल्‍पकलेचा अविष्‍कार पाहता या मंदिराची तुलना खजुराहोच्‍या मंदिराशी केली जाते. या स्‍थानाचे मूळ नाव कोप्‍पम किंवा कोप्‍पद होते. पण, मोगल सरदार खिद्रखान मोकाशीने कोप्‍पम जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या नावावरून खिद्रापूर असे नाव त्‍याला मिळाले. येवूर (जि. विजापूर) येथील शिलालेखात कोपेश्‍वराचा उल्‍लेख मिळतो. तसेच एका ताम्रपटातही या मंदिराचा उल्‍लेख सापडतो.

Image result for khidrapur

मंदिरात २ शिवलिंग

गाभार्‍यात कोपेश्‍वर (महेश) आणि धोपेश्‍वर (विष्‍णू) अशी दोन शिवलिंगे आहेत. याला लागूनच सभामंडप आहे. सभामंडपावर सहा दगडी गवाक्ष असून हे वैशिष्‍ट्‍य असणारे हे असे एकमेव मंदिर आहे. या मंदिरात नंदी नाही, हे त्‍याचे दुसरे वैशिष्‍य होय. मंदिराचे वेगळेपण म्‍हणजे स्‍वर्गमंडपाची रचना. या मंडपाबाहेर २४ हत्तींची मूळ रचना होती. पैकी ११ हत्ती येथे पाहावयास मिळतात. चार प्रवेशद्‍वार आणि ४८ खांबांवर हे मंदिर उभारलेले असून मंदिराच्‍या दर्शनी भागात आकाशाच्‍या दिशेने १३ फूट व्‍यासाचे गवाक्ष आहे. त्‍याच मापाची खाली रंगशिला (गोलाकार दगडासारखी) असून त्‍याभघेवती १२ खांब वर्तुळाकृती आढळतात. मंदिरावर नर्तिका, वादक, शस्‍त्रधारी द्‍वारपाल, सप्‍तमातृकांच्‍या प्रतिमा आहेत. यावरून, तत्‍कालीन समाजातील स्‍त्रियांना असणारे उच्‍च स्‍थान समजते. 

Related image

मंदिर परिसरात १२ शिलालेख

मंदिर परिसरात १२ शिलालेख असून त्‍यातील ८ शिलालेख कन्‍नड भाषेतील आहेत. त्‍यापैकी एक संस्‍कृतमध्‍ये, दुसरा देवनागरीत आहे. पहिला शिलालेख नगारखान्‍याच्‍या दक्षिण बाजूच्‍या विरगळावर जुन्‍या कन्‍नड भाषेत लिहिले आहे. आणखी एका शिलालेखात कोपश्‍वराची स्‍थिती, कुसुमेश्‍वर, कुटकेश्‍वर या नावांचा उल्‍लेख मिळतो. 

दक्षिण स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव

मंदिरात प्रवेश करताना नगारखाना, स्‍वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ, गाभारा असे बांधकाम दिसते. मंदिराच्‍या पायथ्‍याशी खुरशिला, गजपट्‍ट त्‍यावर नरपट्‍ट आणि त्‍यावरील देवकोष्‍ट (चौकट असल्‍यासारखे) आणि नक्षीकाम अशी रचना दिसते. मंदिराचे शिखर गोपुरासारखे असल्‍याने दक्षिणेतील स्‍थापत्‍यशैलीचा प्रभाव दिसतो. 

मंदिरावरील भवानी, काळभैरव, विष्‍णू, ब्रम्‍हदेव, चामुंडी, गणपतीची मूर्ती ही हिंदू देवदेवता, पंचतंत्रातील कथा तर उत्तरेच्‍या बाजूस घंटा वादिका, अहिनकुल (साप-मुंगुस), मिथून शिल्‍प आदी शिल्‍पे जैन मंदिराची वैशिष्‍ट्‍ये दशर्वणारी आहेत.  

Image result for khidrapur

मंदिरात आढळते आखाती शिल्‍प 

मंदिरावर इराणी किंवा आखाती व्‍यक्‍तीचे शिल्‍प आहे. इराणचा बादशहा  दुसरा खुस्रो याने राजदुतामार्फत चालुक्‍य दरबारी नजराणा पाठवला होता, असे जाणकार सांगतात. यावरून, चालुक्‍यांचे इराणशी संबंध होते, असे दिसते. या भेटीचे प्रतिक म्‍हणून त्‍या इराणी राजदुताचे शिल्‍प कोरले असावे. 

Image result for khidrapur

सप्‍टेंबर, १७०२ मध्‍ये मोगल बादशाह औरंगजेबने केलेल्‍या आक्रमणात येथील मूर्तींची मोडतोड केली. २००५ साली आलेल्‍या महापुरातदेखील मंदिर सुस्‍थितीत राहिले होते. मध्‍यंतरी, स्‍वर्गमंडप, काही स्‍तंभाची पडझड झाली होती. पुरातत्‍व विभागाने त्याची डागडुजी केली होती. आता आर्किलाजिकल सर्वे ऑफ इंडियाचे मंदिराच्‍या भोवती तटबंदीचे काम सुरू झाले असून हे बांधकाम पूर्ण होत आले आहे. हे काम गेली १० वर्षे सुरू होते. 

पर्यटन केंद्र म्‍हणून आजही दुर्लक्षित 
‘‘धार्मिक पर्यटन  केंद्र म्‍हणून आजही खिद्रापूर विकसित झालेले नाही. येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, पर्यटकांसाठी येथे निवासाची सोय नाही. हॉटेल्‍स नाहीत. महिलांसाठी प्रसाधनगृह नाहीत. या सोई येथे होणे आवश्‍यक आहे.  पुरातत्‍व खात्‍याने मंदिरात आणि मंदिर परिसरात प्रकाश व्‍यवस्‍था करण्‍याची गरज आहे.’’ 

- प्रा. शशांक रामचंद्र चोथे (इतिहास संशोधक) 

Image result for khidrapur

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

खिद्रापूरला जाण्‍याचा मार्ग 

 एसटीने पुढील तीन मार्गाने खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर) येथे जाता येते. 

हातकणंगले-शिरोळ-नृसिंहवाडी-कुरुंदवाड-अकिवाट-खिद्रापूर

कोल्‍हापूर-इचलकरंजी-कुरूंदवाड-अकिवाट-खिद्रापूर 

कोल्‍हापूर-हुपरी-रेंदाळ-बोरगाव-दत्तवाड-सैनिक टाकळी-खिद्रापूर