Sun, Jul 21, 2019 12:01



होमपेज › Kolhapur › जि.प. प्रशासनात वाढला कोल्हापुरी टक्‍का

जि.प. प्रशासनात वाढला कोल्हापुरी टक्‍का

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 07 2018 10:59PM

बुकमार्क करा




कोल्हापूर : नसिम सनदी 

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांत पहिल्यांदाच कोल्हापुरी टक्‍का वाढला आहे. जि. प. मधील दोन रिक्‍त पदे वगळता उर्वरित 13 पैकी तब्बल 8 पदांवरील अधिकारी हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मूळचे येथीलच रहिवाशी असल्याने त्यांना भागाची आणि समस्यांचीही तितकीच जाण असल्याने कामकाजातही त्याचे प्रतिबिंब उमटताना दिसत आहे. 

आतापर्यंत जिल्हा परिषदेतील प्रमुख पदांवर जिल्ह्याबाहेरीलच अधिकार्‍यांचा दबदबा असायचा. आता मात्र हे चित्र बदलले असून एकूण अधिकार्‍यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त संख्या ही कोल्हापूरकरांची आहे. त्याचा प्रशासकीय कामकाजावर कितपत प्रभाव पडला हा भाग वेगळा असलातरी स्थानिक परिस्थितीची जाण असल्याने स्थानिक लोकांना मात्र अधिकार्‍यांविषयीची आत्मियता कायम आहे. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्यस्थितीत सीईओ, अतिरिक्‍त सीईओ, ग्रामपंचायत, मुख्य वित्त लेखाधिकारी, पशुसंवर्धन हे विभाग वगळले तर उर्वरित 8 विभागांत कोल्हापूरच्याच अधिकार्‍यांचा बोलबाला आहे. सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण अधिकारी हे पद सध्या रिक्‍त आहे. 

सीईओ डॉ. कुणाल खेमनार हे औरंगाबादचे तर अतिरिक्‍त सीईओ इंद्रजित देशमुख हे सांगली पलूसचे आहेत. ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव व मुख्य वित्त लेखाधिकारी संजय राजमाने हे पुण्याचे तर पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे हे लातूरचे आहेत. या पाचजणांचा अपवाद वगळता उर्वरित अधिकारी हे कोल्हापूरचे स्थानिक रहिवाशी आहेत. 

बांधकामचे कार्यकारी अभियंते तुषार बुरूड हे कसबा बावड्याचे आहेत. ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंते एस. एस. शिंदे हे शहरातील आहेत. पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई या गारगोटीच्या आहेत. जिल्हा कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावचे आहेत. महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतेच रुजू झालेले सोमनाथ रसाळ हे इचलकरंजीचे आहेत. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पाटील हे गडहिंग्लजचे आहेत.

शिक्षणाधिकार्‍यांच्या रूपाने जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची धुरा पहिल्यांदाच कोल्हापूरच्याच सुपुत्रांवर आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले हे कागल तालुक्यातील मळगे खुर्दचे तर माध्यमिक शिक्षणाधिकारी  किरण लोहार हे शाहूवाडी तालुक्यातील येळाणे गावचे आहेत. एका जिल्ह्यातील दोन अधिकार्‍यांनी शिक्षण विभाग सांभाळण्याचा हा योग दुर्मीळच म्हणावा लागेल.