Sat, Feb 23, 2019 10:32होमपेज › Kolhapur › कोल्हापुरी गुळाला साखरेचे ग्रहण!

कोल्हापुरी गुळाला साखरेचे ग्रहण!

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 12:56AM

बुकमार्क करा
कौलव : राजेंद्र दा. पाटील

कोल्हापूरच्या गूळ उद्योगात गुणवत्ता, चव व दर्जा वाढवण्यासाठी रसायनविरहित गूळनिर्मितीचा प्रयोग सुरू आहे. मात्र, दुसर्‍या बाजूला गुळासाठी साखरेचा अमर्याद वापर सुरू झाल्यामुळे कोल्हापुरी गुळाची चव व दर्जा बिघडू लागला आहे.

अगदी पूर्वांपार कोल्हापुरी गुळाने देश-विदेशाला भुरळ घातली आहे. शाहूकालापासून गूळ उद्योगाला भरभराटीचा काळ सुरू झाला होता. त्यामुळे गूळ हा कोल्हापूरचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडरच बनला आहे. उसाच्या रसापासून गूळ बनवण्याची प्रक्रिया लोकमान्य झाली आहे. गूळ बनवताना गरजेनुसार रसायने व चुन्याचा वापर केला जातो. तरीही संपूर्ण जगात कोल्हापुरी गुळाचा गोडवा पसरला आहे. गूळ हा मानवी आरोग्याला आरोग्यदायी समजला जातो. शरीराला लागणारे कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन व अन्य घटक गुळातून मिळतात. त्यामुळे गूळ बनवताना चव, दर्जा व गोडीवर कटाक्षाने लक्ष दिले जाते. 

गेल्या काही वर्षांत आरोग्याबाबत जागृती होऊ लागल्यामुळे रसायनविरहित गूळ व काकवी बनवण्याकडे कल वाढला आहे. आयुर्वेद व होमिओपॅथीमध्येही गुळाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांत कोल्हापुरी गुळाला साखर मिश्रणाचे ग्रहण लागले आहे. गुळाचा रंग व चव वाढवण्यासाठी आदणातच साखर मिसळण्याची प्रथा रूढ झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात उसाचा सरासरी साखर उतारा कमी असतो. साखर दर घसरले आहेत. त्यामुळे गूळ बनवण्यासाठी साखर वापरली जाते. मात्र, आता सर्रास प्रत्येक काहिलीत साखर मिसळली जात आहे. या गुळाचा रंग पांढराशुभ्र व गूळ घट्ट बनतो व वजन वाढते. या गुळाला टिकाऊपणा नसतो.
मुळात साखरेत गंधक व विविध रसायनांचा मोठा वापर केला जातो. त्यामुळे साखर आरोग्याला घातक असल्याचा दावा केला जातो. गूळ बनवण्यासाठी साखरेचा बेसुमार वापर झाल्यामुळे गुळाचाही साखरेप्रमाणेच गुणधर्म बनतो. परिणामी, गुळाचा कोल्हापुरी ब्रँड धोक्यात येऊ लागला आहे. 

दर्जा घसरू लागला आहे. एकीकडे आरोग्यदायी रसायनविरहित गूळ बनवण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे कोल्हापुरी गुळाला साखरेच्या मिश्रणाचे ग्रहण लागल्यामुळे कोल्हापुरी गुळाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.