होमपेज › Kolhapur › कोल्हापुरी हिसका!

कोल्हापुरी हिसका!

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 11:40PMकोल्हापूर : दिलीप भिसे 

कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत फोफावलेल्या संघटित आणि राजकारण्यांच्या आडोशाला दडून समाजात अस्थिरता माजविणार्‍या व्हाईट कॉलर गुंडांना पोलिसांनी कोल्हापुरी हिसका दाखवून दोन वर्षांत परिक्षेत्रातील 78 नामचिन टोळ्यांतील 530 सराईतांना ‘मोक्‍का’ कायद्यांतर्गत बेड्या ठोकून कोठडीत जेरबंद केले आहे. गुंडगिरी करणार्‍या 882 फाळकूटदादांना तडीपार करण्यात आले आहे. युवतीशी असभ्य वर्तन करणार्‍या 48 हजारांवर टपोरींना निर्भया पथकाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. 

मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून वाहतूक शाखेच्या यंत्रणेला खुलेआम आव्हान देणार्‍या तब्बल 7 लाख 14 हजार 842 वाहनधारकांवर दोन वर्षांत कारवाईचा बडगा उगारत 17 कोटी 78 लाख 71 हजार 865 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात कारवाईचे सर्वाधिक प्रमाण आहे. अल्पवयीन मुलांना बेजबाबदारपणे वाहने पुरवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या दीड हजारावर पालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.

 विनासायास मिळकतीसाठी म्हणे, लुटमारी हा शार्टकट ?

कोल्हापूर,सांगलीपाठोपाठ पुणे, सोलापूर ग्रामीणसह सातारा जिल्ह्यात आर्थिक, अनैतिक, वैमनस्य,जमिन वादातून गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. घरफोडी,चोरी,दरोड्यासह ठकबाजीच्या गुन्ह्यातही कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. चिरीमिरीला सोकावलेल्या फाळकुटांचे कारनामे थांबले नाहीत. सावकारी टोळ्यासह खंडणी वसुलीचा सिलसिला चालूच आहे. विनासायास श्रीमंतीचा ‘शार्टकट’ मार्ग असलेल्या फसवणूकीचा फंडाही बेधडक चालूच आहे.

सराईत टोळ्यांचे कंबरडेच

मोडण्याचा प्रयत्न शांतता-सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍या आणि कायद्याचेच राज्य आहे का, अशीच काहीशी शंकास्पद स्थिती निर्माण करणार्‍या ‘गुंडाराज’विरुद्ध कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पोलिस दलाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीची दखल घ्यावीच लागेल. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, सांगलीसह सातारा, पुणे, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारांचे कंबरडेच मोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.