Tue, Mar 19, 2019 20:27होमपेज › Kolhapur › जि.प.तर्फे आजपासून घर टू घर टीबी रुग्ण सर्वेक्षण

जि.प.तर्फे आजपासून घर टू घर टीबी रुग्ण सर्वेक्षण

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 9:57PM

बुकमार्क करा

कोल्हापूर: प्रतिनिधी

सर्वाधिक धोकादायक तरीही दुर्लक्षित असणार्‍या टीबी आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी आता जिल्हा परिषदेने नवे रुग्ण सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. 4 ते 18 डिसेंबर या कालावधीत इचलकरंजी व गारगोटी शहरासह शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, चंदगड, कागल या 5 तालुक्यातील 2 लाख 19 हजार 162 लोकसंख्येची घरात जाऊन तपासणी होणार आहे. संभाव्य रुग्णांची तपासणी, उपचार, आहार जि.प. तर्फे पुरवले जाणार असून खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्यांची बिलेही जि.प. कडून आदा केली जाणार आहेत, अशी माहिती जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक व सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्यक्ष टीबी रुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. टीबी रुग्ण तपासणीकरता आजच्या घडीला सीपीआर व सावित्रीबाई फुले या सरकारी रुग्णालयात अद्यावत मशीन उपलब्ध आहेत. आता गडहिंग्लज ग्रामीण रुग्णालय व इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाला आणखी दोन मशीन उपलब्ध झाले असून त्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे, असे सीईओ डॉ. खेमनार यांनी सांगितले. जिल्ह्यात गेल्या वर्षी 2805 नवीन टीबी रुग्ण आढळले. यापैकी 2416 जणांवर उपचार सुरू करण्यात आले असून 389 रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. टीबीचे प्रमाण जास्त असले तरी समाजाच्या मानसिकतेमुळे नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

यासाठी टीबी कर्मचारी व आशा, एएनएम यांच्यामार्फत सर्वेक्षण होणार असून 136 पथके त्यासाठी नेमण्यात आली आहेत. यावर नियंत्रणासाठी सीईओंच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीही नेमण्यात आली आहे. बैठकीला क्षयरोग अधिकारी उषादेवी कुंभार, आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, जि.प. सदस्य प्रसाद खोबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 99 डॉट सिस्टीम ठरणार वरदान
टीबीसाठी ढीगभर गोळ्या घेण्यापेक्षा आता 99 डॉट नावाची रोज एकच टॅब उपलब्ध करून दिली जात आहे. या गोळीच्या प्रत्येक पाकिटात टोल फ्री नंबर देण्यात आला असून, गोळी घेतल्यानंतर त्या नंबरवर मिस कॉल द्यावयाचा आहे, जर दिला नाही तर कॉल सेंटरमधून फोन येणार आहे. औषधे चुकू नयेत यासाठी हा उपक्रम पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे, असे सीईओ डॉ. खेमनार यांनी सांगितले.