Wed, Jul 17, 2019 18:21होमपेज › Kolhapur › जिल्हा परिषद सदस्य राबतोय रोजंदारीवर

जिल्हा परिषद सदस्य राबतोय रोजंदारीवर

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 22 2018 12:32AMकोल्हापूर : नसिम सनदी 

कडक इस्त्रीचे पांढरे शुभ्र कपडे, मनगटावर सोन्याचे कडे, गळ्यात जाडजुड सोनसाखळी, मागे पुढे रुंजी घालणार्‍या कार्यकर्त्यांचा गराडा आणि दिमतीला चारचाकी वाहन असा थाट म्हटला की, तो जिल्हा परिषद सदस्यच असणार हे अंगवळणी पडलेले चित्र; पण यालाही छेद देणारे व्यक्‍तिमत्त्व जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहात आहे आणि विशेष म्हणजे तो एका फौंड्रीमध्ये रोजंदारीवर राबतोय म्हटल्यावर तर कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. पण हीच वस्तूस्थिती आहे उचगाव मतदारसंघातून जि.प. वर निवडून आलेले महेश चौगुले यांची. फौंड्रीमध्ये काम करताना पूर्णवेळ हजेरी नसल्यामुळे महिन्याला निम्माच पगार मिळत आहे.

निवडून दिलेल्या जनतेच्या अपेक्षांची पूर्ती आणि स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अशा दुहेरी पातळीवर संघर्ष करण्याची वेळ चौगुले यांच्यावर आली आहे. चौगुले हे कोल्हापूर स्टील या फौंड्रीमध्ये क्‍वॉलिटी कंट्रोल विभागात कामगार म्हणून काम करत होते. निवडून आल्यानंतरही आर्थिक चणचणीमुळे 9 महिन्यांच्या ब्रेकनंतर ते दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा कामावर रुजू झाले आहेत. यावेळी फरक इतकाच की निवडून येण्यापूर्वी त्यांची नोकरी कायम होती. पगारही महिन्याकाठी 22 हजार रुपये मिळत होता. निवडून आल्यानंतर मात्र कायम नोकरी जाऊन कंत्राटी झाली. जितका वेळ काम तितकाच पगार या सुत्राने रोजंदारी मिळू लागली आहे.

सदस्य म्हणून निवडून आल्यावर जि.प. च्या निधीतून कामे करता येतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा जि.प.च्या निधीला शासनाकडून लावल्या गेलेल्या कात्रीमुळे फोल ठरली आहे. निवडून येऊन 10 महिने झाले तरी निधी नसल्याने सदस्य सैरभैर झाले आहेत. चौगुले हे तर कामगार वस्तीतून राजकारणात आलेले. मागे ना कोणता राजकीय वारसा ना वाडवडिलांची संपत्ती. एक गुंठाभरही शेती नसतानाही केवळ जनतेचे प्रश्‍न सोडवण्याची तळमळ आणि जनतेचे प्रेम या संपत्तीच्या बळावर चौगुले हे भाजपच्या चिन्हावर उचगाव मतदारसंघातून निवडून आले आहेत. आजही चौगुले हे उचगावमध्ये साध्याशा घरात 10 जणांच्या कुटुंबासमवेत राहतात.

जनतेच्या आग्रहास्तवर निवडणूक लढवली. सव्वा लाखाचा खर्च झाला. गेल्या नऊ महिन्यांपासून रजा घेतल्यानंतर जवळपास 2 लाखांचा पगारही बुडाला. विकासकामासाठी निधी नाही, हातात उत्पन्‍नाचे दुसरे साधन नाही. आता जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्यामुळे हाफ टाईमच काम करावे लागत आहे. पगारही अर्धाच मिळत आहे. या पैशात कुटुंबाच्या रोजच्या गरजा भागवणेही शक्य होत नसल्याचे सदस्य महेश चौगुले सांगतात. आमदार महाडिकांच्या कानावर ही गोष्ट गेली असल्याने त्यांनी यातून मार्ग काढण्याचे आश्‍वासनही दिले आहे.  महेश चौगुले जि.प.सदस्य