Sat, May 30, 2020 03:38होमपेज › Kolhapur › यशवंत सिन्हांचे आंदोलन म्हणजे सोंग : रघुनाथदादा

यशवंत सिन्हांचे आंदोलन म्हणजे सोंग : रघुनाथदादा

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 1:32AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्रात अर्थमंत्री असताना कांद्याचे भाव पडले म्हणून कांदाच जीवनाश्यक वस्तूंच्या यादीत घालणारे यशवंत सिन्हा आता मात्र शेतकर्‍यांचे नाव घेऊन आंदोलन करत आहेत, हे त्यांचे मोठे सोंग आहे. सत्तेत असताना शेतकर्‍यांविरोधी धोरणे घ्यायची आणि सत्ता गेल्यावर शेतकर्‍यांच्या नावाने गळे काढायचे, हे चुकीचे आहे. सिन्हा यांनी सत्तेत असताना काय केले याची आता चौकशी व्हायला पाहिजे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला.  प्रेस क्लब कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत पाटील यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री सिन्हा व खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, ढोर मेल्यावर जशी गिधाडे जमा होतात, तशी आता सिन्हांसारखी माणसे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर गळे काढत आहेत.

ज्या अशोक चव्हाणांनी दोन वर्षांपूर्वी ‘एफआरपी’ देण्याची असमर्थता दर्शवून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून सूट मागितली होती, त्याच चव्हाणांची गळाभेट घेण्याचे काम खा. शेट्टी करीत आहेत. मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि आता मोदी अशा चारवेळी गैरकाँग्रेसी सरकार स्थापन करण्यास हातभार लावूनही शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडलेले नाही.

तुपकरांनी अजून बंगला का सोडला नाही शेतकरी संघटनेच्या जीवावर सदाभाऊ खोत राज्यमंत्री झाले, पाशा पटेल व रविकांत तुपकर यांना राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे महामंडळ मिळाले. तुपकरांनी राजीनामा दिला, असे म्हटले जाते; पण तो मुख्यमंत्र्यांनी  मंजूर केलेला नाही. तुपकरांनी अजून सरकारी बंगला आणि गाडी सोडलेली नाही, असा गौप्यस्फोट रघुनाथदादा पाटील यांनी केला. 
दादा, मंत्री झाल्यावर  तरी थापा मारू नका  10 लाख शेतकरी बोगस असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी  कोणतीही माहिती न घेता सांगितले होते, ही शुद्ध थाप होती. निदान मंत्री झाल्यावर तरी अशा थापा मारू नका, नाहीतर लोक तुमच्यावर विश्‍वास ठेवणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

आपले कोण याचा अभ्यास करा शेतकर्‍यांच्या नावाने प्रत्येकजण आंदोलनाची हाक देत असल्याने आता शेतकर्‍यांनीच आपले कोण हे ज्याचा त्याने अभ्यास करून ओळखावे. त्याचे वागणे, बोलणे, चालणे तपासावे असे सांगून रघुनाथदादा पाटील यांनी दर पंचवार्षिक पश्‍चात्ताप व्हायला लागला तर जनतेने कुणाला विचारावे, अशी खोचक टिपणी खा. शेट्टी यांचे नाव न घेता केली.