Mon, Apr 22, 2019 06:07होमपेज › Kolhapur › महाराष्ट्र केसरीसाठी आसूसली कुस्ती पंढरी

महाराष्ट्र केसरीसाठी आसूसली कुस्ती पंढरी

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 4:53PM

बुकमार्क करा
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर कामगिरी समाधानकारक झालेली नाही. कोल्हापूरचे पैलवान सातत्याने अपयशी ठरत असल्याने या अपयशामागील कारणांचा आढावा वृत्त मालिकेतून घेत आहोत. 

कोल्हापूर : एकनाथ नाईक 

राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या राजाश्रयाने कुस्ती ही कला कोल्हापुरात जोपासली गेली आहे. बलदंड शरीर, खंबीर मन घडवायचे असेल, तर कुस्तीशिवाय पर्याय नाही. हे ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी या कलेला उत्तेजन दिले. संस्थान काळात कोल्हापूर शहरात 86 तालीम संस्था होत्या. त्यावेळी दिवस उजडायचा तो मल्लांच्या खंम्म मारण्याच्या आवाजाने, तर मावळायचा शड्डूने! पण, सध्या कुस्तीला सुस्ती आली आहे. 

 वाचा बातमी : रणरागिणींच्या राजधानीत महिलांचे कुस्ती मैदान

संस्थान काळात बरेचसे तरुण मल्ल आपल्या दिवसभराची कष्टाची रग आखाड्यातील लाल मातीत जिरवायचे. अशा तालमींना शाहू महाराज स्वत: भेटून मल्लांना हेरून त्यांच्या खुराकाची सोय करायचे. काहींची कुस्ती कला वाढावी म्हणून त्यांना संस्थानाच्या देखरेखीखाली चालणार्‍या लाल आखाड्यात ठेवत असत. त्यावेळचा लाल आखाडा म्हणजे, कुस्तीगीरांचे महाविद्यालय होते. उर्मी आणि इर्षेशिवाय कुस्ती होणार नाही. हे ओळखून त्या काळी महाराज गावातील तालमींचे पैलवान आणि लाल आखाड्यातील पैलवानांच्या लढती घेत होते. महाराज विदेशी पाहुण्यांसाठी अशी मैदाने भरवायचे. तालमी झाल्या, आखाडे झाले; पण कुस्त्यांच्या मैदानासाठी मोठं मैदान नव्हते. शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून वैशिष्ट्यपूर्ण अशा खासबाग मैदानाची उभारणी झाली. मैदानाच्या कोणत्याही भागातून आखाड्यातील कुस्ती दिसते, असे वैशिष्ट्यपूर्ण मैदान भारतात कुठेच नाही. 

सन 1912 च्या सुमारास या मैदानात अनेक लढती झाल्या. शाहू महाराज तेवढ्यावर थांबले नाहीत. परप्रांतातील मल्लांना कोल्हापुरात आणून येथील मल्लांशी लढविले. त्यामुळे पंजाब, पाकिस्तान व अन्य देशांतील मल्ल अजूनही कोल्हापूरला कुस्तीच्या लढतीसाठी येतात. राजर्षी शाहू महाराजांनंतर राजाराम महाराज व छत्रपती शहाजी महाराजांनी ही परंपरा टिकविण्याचे काम केले. संस्थाने विलीन झाल्यानंतर कुस्तीला असलेला राजाश्रय संपला व पुढे कुस्तीला लोकाश्रय मिळाला. सध्या कुस्तीला सहकाराश्रय मिळत आहे. हा वारसा जपताना कुस्तीक्षेत्रातील हिंदकेसरी हा सर्वोच्च बहुमान महाराष्ट्रातील अनेक मल्लांनी मिळविला आहे. श्रीपती खंचनाळे यांनी पहिला हिंदकेसरी होण्याचा मान मिळविला. रूस्तूम- ए-हिंद होण्याचा मानही कोल्हापूरच्या दादू चौगुले यांनी मिळविला. महाराष्ट्राची ही कुस्ती परंपरा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. खाशाबा जाधव, माणगावे गुरुजी, मारुती माने, हरिश्‍चंद्र बिराजदार, संभाजी वरूटे, दादू चौगुले, राम सारंग, संभाजी पाटील, नामदेव मोळे, विनोद चौगुले, नंदू आबदार यांचा उल्लेख करावा लागेल. 

कोल्हापूरने पंधरा वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकाविला आहे. युवा मल्ल विनोद चौगुले याने तर महाराष्ट्रात कुस्तीच्या लढतींचा धुमाकूळ घातला होता. सन 2000 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांनी पटकविला; पण त्यानंतर कोल्हापुरात गदा आलेली नाही. या किताबासाठी तब्बल दीड तप कुस्तीपंढरी आसूसलेली आहे. कुस्तीक्षेत्रातही आता झपाट्याने बदल होत आहे. मातीत तीन-तीन तास चालणारी कुस्ती आता गादीवर पाच मिनिटांत आटोपत आहे. शक्ती, युक्ती व चपळतेचा जोर कुस्तीत वाढला आहे. काळाच्या ओघात कुस्तीपंढरी कोल्हापूरने हे आव्हान पेललेच पाहिजे.