Thu, Feb 21, 2019 15:52होमपेज › Kolhapur › सांडपाणी प्रक्रिया टाकीत कामगार गुदमरले : एकाची प्रकृती गंभीर

सांडपाणी प्रक्रिया टाकीत कामगार गुदमरले : एकाची प्रकृती गंभीर

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 27 2017 1:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

दुधाळी नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या टाकीचे रंगकाम करणारे सहा कामगार गुदमरले. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास पंचवीस फूट खाली उतरून रंगकाम करीत असताना एक जण बेशुद्ध झाला, तर पाच जणांना श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला. या सर्वांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने त्रास जाणवल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

सुनराम हासदा (वय 25), सायबा हासदा (28), गरलाई हेंबरम (30), रूपाई मुरमू (25), भूपाल हासदा (22), उदय राम मंडी (24, सर्व रा. पश्‍चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दुधाळी नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी सुरू आहे. येथे 17 बाय  11 मीटर व्यासाची पाणी साठवणूक टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीत सुमारे पंचवीस फूट खाली उतरून रंगकाम करण्यात येत होते. प्रकल्पाचे काम लक्ष्मी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीकडे आहे. तर रंगकाम पुण्याच्या गीता सरफेस कोटिंग कंपनीला देण्यात आले आहे.
दोन महिन्यांपासून काम सुरू असून मंगळवारी 

सकाळी सर्व कामगारांनी दुपारचे जेवण केले. यानंतर सर्व जण खाली उतरले होते. टाकीमध्ये जाण्यास टॉवर क्रेनचा वापर करावा लागतो. सायंकाळी चारच्या सुमारास सायबा हासदा हा कर्मचारी अचानक चक्कर येऊन कोसळला. तर इतर दोघांनाही श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला. याची माहिती प्रकल्प अभियंता सूर्यकांत कोळेकर, फिरोज अन्सारी या दोघांना समजली. घटनेचे गांभीर्य ओळखून दोघांनी तत्काळ अग्निशमन दलाला वर्दी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने सर्वांना वर काढले. सर्वांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत झाली.