होमपेज › Kolhapur › कामगार विमा रुग्णालयास मिळणार नवसंजीवनी

कामगार विमा रुग्णालयास मिळणार नवसंजीवनी

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 30 2017 9:03PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सुनील सकटे

शासकीय विश्रामगृहानजीक गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या राज्य कामगार  विमा रुग्णालयास आता नवसंजीवनी मिळणार आहे. येत्या वर्षभरात हे रुग्णालय सुरू होणार आहे. त्याद‍ृष्टीने नूतनीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. राज्य कामगार विमा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्‍त रुग्णालयाची पाहणी केली आहे. औद्योगिक विकासामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात कामगारांची मोठी संख्या आहे. राज्य कामगार विमा योजनेंतर्गत या कामगारांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. यासाठी काही वर्षांपूर्वी प्रशस्त रुग्णालय उभारण्यात आले आहे.

कसबा बावडा रोडवरील शासकीय विश्रामगृहाच्या मागील विस्तीर्ण जागेत उभारण्यात आलेली इमारत वापराविना पडून आहे. अनेक वर्षे आंदोलन करूनही या इमारतीचा वापर होत नसल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून बंद अवस्थेतील रुग्णालय पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. त्याचाच भाग म्हणून राज्य कामगार विमा योजना विभागाच्या अधिकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. संबंधित इमारतीची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एवढेच नाही, तर नुकतेच राज्य कामगार विमा योजनेचे अधिकारी राकेश अगरवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत संबंधित रुग्णालयाची पाहणी केली आहे. या पाहणीत इमारतीची झालेली मोडतोड, करावयाची डागडुजी यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे.  इमारतीच्या पाहणीसह रुग्णालय इमारत नूतनीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. इमारतीच्या पुनर्रचनेसाठी या विभागाचे विनय बकाडे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्कासाठी नियुक्‍ती केली आहे. बकाडे यांनी सा. बां. अधिकार्‍यांशी सातत्याने संपर्क साधून कामाचे नियोजन केले आहे.

इमारतीची अवस्था पाहून आवश्यक तेथे बांधकाम करणे, डागडुजी करणे यासाठी अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू आहे. या इमारतीसाठी जानेवारी 2018 पर्यंत खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. या अंदाजपत्रकास राज्य विमा योजना विभागाकडून फेब्रुवारी 2018 पर्यंत प्रशासकीय मान्यता देण्याचे नियोजन आहे. मे 2018 पासून इमारतीच्या नूतनीकरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. एक वर्षात म्हणजेच मे 2019 पर्यंत नवीन सुसज्ज इमारत तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या  कामासाठी राज्य कामगार विमा योजना,  सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इलेक्ट्रिक विभागया तिन्ही विभागांचे  समन्वयातून कामकाज करण्यात येणार आहे. रुग्णालय सुरू झाल्यास कामगारांना फायदा होणार आहे.