Mon, May 27, 2019 00:41होमपेज › Kolhapur › कोल्हापूर लवकरच होणार कोंडाळामुक्त

कोल्हापूर लवकरच होणार कोंडाळामुक्त

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 1:29AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

कोल्हापूर शहरात दररोज निर्माण होणार्‍या सुमारे 200 टन कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने 37 कोटी 17 लाखांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याचा जी.आर.ही प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात 6 कोटी 69 लाखांची 104 टिपरसह (छोटा हत्ती वाहन) इतर वाहने घेण्यात येणार आहेत. परिणामी, लवकरच कोल्हापुरातील तब्बल 770 कोंडाळे (कंटेनर) हटवून शहर कोंडाळामुक्त होणार आहे. घंटागाडीही बंद होणार असून, नागरिकांनी टिपर वाहनातच ओला व सुका असा वेगवेगळा करून कचरा टाकायचा आहे. टिपरमधून कचरा थेट प्रक्रिया केंद्रावर नेला जाणार आहे.  


सद्यस्थितीत कोल्हापूर शहर कचरा कोंडाळ्यांनी व्यापले आहे. 66.82 किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहरात 770 कोंडाळे आहेत. शहराच्या ठराविक भागात 240 घंटागाडीद्वारे कचरा गोळा करून तो कोंडाळ्यात टाकला जातो. कोंडाळे उचलण्यासाठी चौदा आर. सी. (कचरा नेणारे वाहन) वाहने आहेत. घंटागाडीचा कर्मचारी जास्तीत जास्त एक ते दोन किलोमीटर चालून कचरा गोळा करतो. त्यामुळे प्रक्रिया केंद्रावर नेऊन कचरा टाकणे शक्य होत नाही. परिणामी, ते कोंडाळ्यातच कचरा टाकतात. काहीवेळा आर. सी. वाहन आले नाही, तर कोंडाळा ओसंडून रस्त्यावर पडलेला दिसतो. 

आता नव्या प्रस्तावानुसार 104 टिपरसह इतर वाहने घेण्यात येणार आहेत. घंटागाडी बंद करून टिपर वाहनेच शहरात फिरणार आहेत. कचरा गोळा करून टिपरमधूनच तो प्रक्रिया केंद्रावर नेला जाणार आहे. झूम प्रकल्पाजवळील 30 प्रभागांतील कचरा गोळा करून तेथीलच बायोगॅस प्रकल्पात दिला जाणार आहे. पुईखडीजवळील पाच प्रभागातील कचरा तेथील प्रकल्पात नेला जाणार आहे. आयसोलेशन परिसरातील पाच प्रभाग, लक्षतीर्थ वसाहत परिसरातील पाच प्रभाग व साळोखेनगर परिसरातील पाच प्रभागातील कचराही अशाच पद्धतीने टिपरमधून जमा करून प्रक्रियेसाठी देण्यात येणार आहे. 

अशाप्रकारे पहिल्या टप्प्यात 50 प्रभागातील कचरा थेट टिपर वाहनातून गोळा करून प्रक्रियेसाठी देण्यात येईल. परिणामी, या प्रभागातील कचरा कोंडाळे हटविण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसर्‍या टप्यात 65 टिपर वाहने येणार आहेत. त्यावेळी उर्वरित 31 प्रभागातील कचराही अशाच पद्धतीने जमा करून कोंडाळेमुक्त शहर केले जाणार आहे. सध्या घंटागाडीसाठी 200 कर्मचारी व साफसफाईसाठी 300 कर्मचारी आहेत. त्यातील काहींना टिपर वाहनांवर हेल्पर म्हणून घेण्यात येणार आहे. तर उर्वरित कर्मचार्‍यांना त्या-त्या प्रभागात साफसफाईचे काम दिले जाणार आहे.