Thu, Jul 16, 2020 09:52होमपेज › Kolhapur › होय, कोल्हापूर पाण्याची गळती ६९ टक्के

होय, कोल्हापूर पाण्याची गळती ६९ टक्के

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील वॉटर ऑडिटसाठी नेमण्यात आलेल्या संस्थेने 69 टक्के पाणी गळती असल्याचा अहवाल दिला असल्याची स्पष्ट कबुली जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी बुधवारी महासभेत दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अर्जुन माने होते. आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी प्रमुख उपस्थित होते. 

टाक्या आहेत; पण पाणी नाही...

सत्यजित कदम यांनी 69 टक्के पाण्याची गळती होते, हे खरे आहे का? असा प्रश्‍न उपस्थित करून पाण्याच्या गळतीबाबत प्रश्‍न उपस्थित केला. मार्केट यार्ड, शाहुपूरी आदी ठिकाणच्या टाक्या बांधून रिकाम्या आहेत. शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकल्या असल्या, तरी त्यात पाणी नाही. थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही. परंतु, योजनेवरील कामाकडे जल अभियंता कुलकर्णी यांचे लक्ष नाही. 

कामावर देखरेखीसाठी ठोक मानधनावर 

प्रत्येक पाच कि. मी. अंतरासाठी इंजिनिअर नेमण्याची सूचना अद्याप मान्य झाली नसल्याचेही कदम यांनी सांगितले. विजय सुर्यवंशी यांनी कन्सल्टंट करतो काय? असा प्रश्‍न उपस्थित केला. मुरलीधर जाधव व अजित ठाणेकर यांनी 69 टक्के पाणी गळती होत असेल तर शहराला पाणी कसे पुरणार? असा प्रश्‍न विचारला. 

तफावत आढळल्यास कोणताही अहवाल ग्राह्य...

कुलकर्णी यांनी वॉटर ऑडीट रिपोर्टमधून 69 टक्के गळती असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतू पुन्हा संयुक्त पाहणी क्रॉस चेक करणार असल्याचे सांगितले. त्यावर ठाणेकर यांनी संबंधित संस्थेला वॉटर ऑडीटसाठी किती रक्कम दिली होती, अशी विचारणा केली. कुलकर्णी यांनी 2 कोटी 7 लाख दिल्याचे सांगितले. मग ठाणेकर यांनी महापालिकाच ऑडीट करणार होती तर मग खासगी संस्थेला एवढी मोठी रक्कम का दिली असा प्रश्‍न उपस्थित करून ती रक्कम बुडाली का? असा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच महापालिकेचा पाणी गळतीचा अहवाल आणि संबंधित खासगी संस्थेने दिलेला अहवाल यात तफावत असल्याचे कोणता अहवाल ग्राह्य मानायचा अशी विचारणाही केली. त्यावर कुलकर्णी निरूत्तर झाले.