Sat, Apr 20, 2019 16:44होमपेज › Kolhapur › ग्रीटिंग कार्ड, गिफ्टस्नी सजली बाजारपेठ

ग्रीटिंग कार्ड, गिफ्टस्नी सजली बाजारपेठ

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

व्हॅलेंटाईन डे निमित्त विविध प्रकारचे ग्रीटिंग कार्डस्, गिफ्टस्, चॉकलेट, गुलाब, जरबेरा फुलांनी बाजारपेठ सजली आहे. तरुणाईकडून सोशल मीडियावर आठवडाभरापूर्वीपासून व्हॅलेंटाईन डे सुरू झाला असून फिव्हर वाढला आहे. हीर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनू जोड्या प्रत्येक संस्कृतीत दिसतात. प्र्रेमकाव्ये, प्रेमपत्रे, नाटके जगात लिहिली गेली आहेत. अलीकडील काळात व्हॅलेंटाईन डे साजरे करण्याची क्रेझ वाढली आहे. 14 फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ प्रेम व्यक्‍त करण्याचा हा अनोखा दिवस. या दिवशी अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेलं प्रेम व्यक्‍त करण्याबरोबर प्रियकराला खास सरप्राईज दिले जाते. 

व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्‍वभूमीवर फूल बाजारपेठेत डच, टेरीकोट, साधा गुलाब यांच्यासह विविध प्रकारची फुले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. महाद्वार रोड, महालक्ष्मी मंदिर, राजारामपुरी परिसरातील दुकानदारांनी व्हॅलेंटाईन डे साठी आकर्षक गिफ्ट, ग्रीटिंग कार्ड, टेडी बेअर, सेंटेड रोज, पेपर गिफ्ट बॅग्ज, फोटो फ्रेम, किचन, घड्याळे ठेवली आहेत. यावर्षी व्हॅलेंटाईनसाठी प्रियसी, पती-पत्नी, बहीण-भाऊ, आई-वडिलांप्रती प्रेम व्यक्‍त करणारी ग्रीटिंग कार्डबरोबर म्युझिकल ग्रीटिंग तरुणाई लक्ष वेधून घेत आहे. हार्टशेप, लव्ह बोटल शो पीस (51 प्रेमाच्या चिठ्ठ्या असणारे), बीनचॅप, हँगिंग वुईथ टेडी अशा प्रकारचे वेगळेपण असणारे गिफ्ट आहेत. शॉपिंग मॉल व गॅलरीजमध्ये खास युवकांना खरेदीवर डिस्काऊंट दिला जात आहे.

सोशल मीडियावर आठवडाभर व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे.  महाविद्यालयातही व्हॅलेंटाईनची तयारी जोरात सुरू झाली आहे. एकमेकांना वेगवेगळ्या दिवशीची माहिती असणारे मेसेज, फोटो शेअर करून प्रेम व्यक्‍त केले जात आहे. दुसरीकडे सामाजिक भान जागृत ठेवायला सांगणारे मेसेजही व्हायरल होत आहेत. काही सामाजिक, युवक संघटनांनी रक्‍तदान शिबिर, अनाथालयास भेटवस्तू देण्याचे उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.