Fri, Jul 19, 2019 07:46होमपेज › Kolhapur › आयसीटी शिक्षकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

आयसीटी शिक्षकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 9:57PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा करताना सरकारने आय.सी.टी. योजना बंद केल्याने हजारो शिक्षकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. ग्रामीण भागातील गरिबांच्या विद्यार्थ्यांना मोफत संगणक शिक्षण मिळणार कसे हा प्रश्‍न आहे.  महाराष्ट्रात राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियाना मार्फत 2007-08 पासून राज्यातील 8 हजार शाळांमध्ये आय.सी.टी. प्रकल्प टप्प्या-टप्प्याने राबविला जात आहे. करोडो रुपये खर्च करून आय.सी.टी. लॅब उभारण्यात आल्या. संगणक प्रशिक्षणासाठी पाच वर्षांच्या मुदतीने शिक्षक नेमले. त्यांना कंत्राटादारामार्फत पगारही देण्यात आला. सरकारने डिसेंबर 2016 मध्ये योजना बंद केली. तीन हजार शिक्षकांची पाच वर्ष पूर्ण झाल्याने त्यांना कमी करण्यात आल्याने लाखो विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.

 सध्या कार्यरत पाच हजार शिक्षकांना गेल्या आठ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. तीन संगणक शिक्षकांनी आत्महत्या केली आहे. इतर राज्याप्रमाणे आयसीटी संगणक शिक्षकांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी 2014 पासून आजतायगत राज्य सर्व श्रमिक संघातर्फे न्याय हक्कासाठी संघटन उभारून राज्य पातळीवर अनेक मोर्चे, आंदोलने, उपोषणे करून निवेदने देण्यात आली. मात्र, आश्‍वासनाशिवाय पदरात काहीच पडले नाही. चालू शैक्षणिक वर्षापासून 9 वी च्या अभ्यासक्रमातून आय.सी.टी.विषय कमी केला आहे. दहावीचा विषय काढण्याच्या विचारात असल्याने शिक्षकांमध्ये संभम्रावस्था आहे. कर्नाटक गोवा, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, केरळ, दिल्ली या राज्यात आय.सी.टी.शिक्षकांना कायम करून घेतले आहे. अभ्यासक्रमात स्वतंत्र आय.सी.टी.विषय आहे. आय.सी.टी. विषय बंद केल्याने संगणक शिक्षकांचेच नव्हे तर विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.