Thu, Jun 20, 2019 20:45होमपेज › Kolhapur › प्रशासनाला तूरडाळीची धास्ती

प्रशासनाला तूरडाळीची धास्ती

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 12:46AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : अनिल देशमुख

रेशनवरून स्वस्त दरात तूरडाळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या तूरडाळीची जिल्हा प्रशासनाने धास्ती घेतली आहे. विक्री होईल इतक्याच तूरडाळीची मागणी करण्याचा पुरवठा विभागाचा विचार आहे. त्यानुसार तूरडाळ मागणी निश्‍चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्य सरकारने यावर्षी शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात तूर खरेदी केली. ही तूर शिल्लक राहिल्याने सरकारने भरडई करून तिची डाळ केली. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली ही तूरडाळ प्रतिकिलो 55 रुपये दराने रेशनद्वारे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने मागणी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

राज्य सरकारने रेशनवरून तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला असला, तरी ती किती प्रमाणात द्यायची, कोणत्या कार्डधारकांना द्यायची, याबाबतची सुस्पष्टता आदेशात नाही. यामुळे किती मागणी करायची, याबाबत पुरवठा विभागात संभ्रम आहे. त्यातच तूरडाळीचा सध्या बाजारात असलेला भाव 70 रुपयांच्या आसपास आहे. हा भावही कमी होण्याची शक्यता आहे. मागणी केलेली तूरडाळ उपलब्ध होईपर्यंत बाजारातील तूरडाळीचा भाव आणखी कमी झाला, तो रेशनवरील तूरडाळीच्या जवळपास आला, तर ही डाळ खरेदीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

दिलेल्या तूरडाळीची विक्री होईलच, अशी किती मागणी आहे, तूरडाळीची एकूण किती मागणी आहे, त्यातील 30 टक्केच तूरडाळ मागवली तर ती किती होऊ शकते, या सर्व बाबींवर सध्या जिल्हा पुरवठा विभागात काथ्याकूट सुरू आहे. यातून एक-दोन दिवसात तूरडाळीची नेमकी मागणी निश्‍चित होण्याची शक्यता आहे. यानंतर या डाळीची जिल्ह्यात आवक होईल, अशी परिस्थिती आहे.