होमपेज › Kolhapur › ‘मांडूळ’ तस्करी; म्होरक्यासह तिघांना अटक

‘मांडूळ’ तस्करी; म्होरक्यासह तिघांना अटक

Published On: Feb 20 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

दुर्मीळ प्रजातीच्या दोनतोंडी मांडुळाची तस्करी करणार्‍या टोळीला करवीर पोलिसांनी कुडित्रे (ता. करवीर) येथील कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर छापा टाकून जेरबंद केले. दोन मांडूळ, मोटारीसह सुमारे 15  लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  म्होरक्या हिंमत जयवंत पाटील (वय 30, रा. तामगाव, ता. करवीर), संजय मारुती जाधव (39, नावलीपैकी धारवाडी, ता. पन्हाळा), पंकज उत्तम कराळे (27, अरिहंत पार्क, एस.एस. सी. बोर्ड, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक दिलीप जाधव व त्यांच्या टीमने सोमवारी दुपारी ही कारवाई केली.

सांगली येथील खणभागातील म्होरक्या हिंमत पाटील तामगाव येथे काही वर्षांपासून वास्तव्यास आहे. दोन दिवसांपूर्वी संजय जाधव व पंकज कराळेशी संपर्क साधून ‘मांडूळ’च्या दोन सापांच्या तस्करीसाठी गिर्‍हाईक शोधण्यास सांगितले. जाधवने सांगलीतील एका व्यापार्‍याशी संधान साधून खरेदीदार असल्याने साप घेऊन कुडित्रे फॅक्टरीलगत कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरील एका शेडजवळ येण्यास सांगितले. तिघेही दुपारी एकत्र आले असता पोलिसांनी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. टोळीत आणखी काही साथीदारांचा समावेश असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

दुचाकीसह मोटारकारची पोलिसांनी झडती घेतली. प्लास्टिकच्या डब्यात दोन मांडूळ आढळून आले. तिघांना ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित संजय जाधव हा पन्हाळा येथील एका शैक्षणिक संस्थेमध्ये सहायक लिपिक म्हणून नोकरीला आहे. तिघांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. प्रशांत माने, प्रथमेश पाटील, अमोल देवकुळे, सुहास पाटील आदींनी कारवाईत भाग घेतला.