Tue, May 21, 2019 12:12होमपेज › Kolhapur › टाऊन हॉल वस्तू संग्रहालयावर सीसीटीव्ही वॉच

टाऊन हॉल वस्तू संग्रहालयावर सीसीटीव्ही वॉच

Published On: Feb 28 2018 1:16AM | Last Updated: Feb 27 2018 11:20PMकोल्हापूर : सागर यादव 

कोल्हापूरचे प्राईड असणार्‍या कोल्हापूर वस्तू संग्रहालय तथा ‘टाऊन हॉल’ म्युझियमच्या संरक्षणासाठी सिक्युरिटी गार्ड, मेटल डिटेक्टर या यंत्रणेसह आता 36 सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच ठेवण्यात आला आहे. राज्यभरातील 13 वस्तू संग्रहालयांसाठी शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागातर्फे या योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरांची सुरक्षीतता पुरविण्यात येणार आहे. याचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा, औंध आणि सिंधखेडराजा येथील संग्रहालयांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.   

ऐतिहासिक वास्तू आणि वस्तूंना राष्ट्राच्या संपत्तीचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी विशेष उपाय-योजना शासनाच्या पुरातत्व विभागातर्फे केल्या जातात. इतर जिल्ह्यांप्रमाणेच किंबहूना थोडा प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा ‘शाहूनगरी’ कोल्हापूरला लाभला आहे. याची माहिती देणारे ‘कोल्हापूर वस्तू संग्रहालय’ तथा टाऊन हॉल म्युझियम जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे.

शेकडो  वर्षांच्या वारशाचे जतन

प्राचीन, मध्ययुगीन आणि अधुनिक अशा तिन्ही कालखंडांचा इतिहास टाऊन हॉलमध्ये एकवटला आहे. इसवी सनापूर्वीपासून जगभराशी कोल्हापूरचे असणारे व्यापारी संबंध, पंचगंगा नदी काठी असणार्‍या प्राचीन संस्कृतीच्या पाऊल खुणा, छत्रपतींची राजधानी असल्याने शिवछत्रपती, रणरागिणी ताराराणी यांचा स्फूर्तीदायी इतिहास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोल्हारला ‘पुरोगामी’ ही विशेष ओळख करून देणारे लोकराजा राजर्षी शाहू यांच्या दूरद‍ृष्टीच्या-सामाजिक कार्याची माहिती देणारे हे संग्रहालय आहे. त्यांच्या राजश्रयाने विकसित झालेल्या कलाक्षेत्राचा वारसाही या संग्रहालयात जतन करण्यात आला आहे. 

आता प्रतीक्षा माहिती पुस्तिका व कॅटलॉगची...

कोल्हापूर वस्तू संग्रहालय (टाऊन हॉल म्युझियम) आत-बाहेरून विकसित करण्यात आले आहे. संग्रहालयाच्या संरक्षणासाठीही विविध प्रकारच्या उपाय-योजना करण्यात आल्या आहेत. यामुळे आता लोकांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे संग्रहालयाची माहिती देणार्‍या पुस्तिका आणि कॅटलॉगची. संग्रहालयातर्फे काही वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेली पुस्तिका आऊट ऑफ प्रिंट झाली आहे. यासाठी संचालक विभागाकडे मागणी केल्याची माहिती क्युरेटर अमृत पाटील यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. 

तीन कोटी रुपयांची विकास कामे...

अशा या महत्त्वपूर्ण वास्तूच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणासाठी अविक्षक अमृत पाटील व त्यांचे सहकारी सात्तत्याने सक्रिय असतात. संग्रहालयाच्या अंतर्गत असणार्‍या सात दालनांच्या विकासासाठी काही वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. अलीकडेच संग्रहालयाच्या बाह्य भागाच्या विकासासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. संग्रहालयाच्या संरक्षणासाठी 24 तासांतील तीन शिफ्टमध्ये 4 गार्डस आणि मेटल डिटेक्टर यंत्रणा सक्रिय आहे. याचा पुढचा भाग म्हणून पुरातत्त्व विभागाच्या संचालक विभागातर्फे राज्यातील संग्रहालयांना सीसीटीव्ही यंत्रणा पुरविण्यात आली आहे. यात 7 बुलेट कॅमेरे , 28 ड्रोम कॅमेरे आणि एका पीटीझेड अशा एकूण 36 सीसीटीव्ही कॅमेरांची व्यवस्था करण्यात आली आहे.