Sat, Jul 20, 2019 09:33होमपेज › Kolhapur › ‘टोमॅटो एफ.एम.’ची गरजू विद्यार्थ्यांना आपुलकीची ऊब..!

‘टोमॅटो एफ.एम.’ची गरजू विद्यार्थ्यांना आपुलकीची ऊब..!

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 1:38AM

बुकमार्क करा

कोल्हापूर / उजळावाईवाडी : प्रतिनिधी

सामाजिक जाणिवेच्या भावनेतून 94.3 टोमॅटो एफ.एम.ने गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेट, चादर व शालचे वाटप करून आपुलकीची ऊब देऊन वेगळा आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमास समाजातील प्रत्येक स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.  94.3 टोमॅटो एफ.एम.ने ‘ऊब आपुलकीची’ उपक्रमांतर्गत समाज घटकास आवाहन केले होते. त्यामधून देणार्‍यांचे हजारो हात पुढे आले व गरजूंना हिवाळ्यात वापरता येणारे साहित्य जमा झाले. शनिवारी (दि. 2) सकाळी दै. ‘पुढारी’च्या संचालिका व 94.3 टोमॅटो एफ.एम.च्या कार्यकारी संचालिका डॉ. स्मितादेवी योगेश जाधव, तेजराज जाधव यांच्या हस्ते व देणगीदार सर्फराज मिद्दा, आदित्य व्हनकवरे, हर्षल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत साने गुरूजी वसाहत विद्यालय क्र. 58 मधील गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. स्मितादेवी जाधव यांनी साने गुरुजी वसाहत विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षिका गायत्री देवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सुभाष धादवड यांनी स्वागत केले. आर. जे. झाहिद यांनी प्रास्ताविक केले. आर. जे. आयशा यांनी आभार मानले. दरम्यान, कणेरीवाडी येथील सिद्धगिरी मठ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अदृश्य काडेसिद्धेश्‍वर महाराज यांच्यासह टोमॅटो एफ.एम. टीमचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.  नाना पाटीलनगर येथील अंध युवक मंचचे विकास हायस्कूलमध्ये शिकणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांनाही ब्लँकेट, चादर, शाल या साहित्याचे वाटप करण्यात आले.

कणेरी मठाचे कार्य कौतुकास्पद : सौ. स्मितादेवी जाधव

कणेरी मठावर चालविण्यात येणारे विविध उपक्रम हे कौतुकास्पद असून भावी पिढीला दिशा देणारे ठरणारे आहेत, असे मत टोमॅटो एफ.एम. व कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी व्यक्त केले. टोमॅटो एम.एम.च्या माध्यमातून ‘ऊब आपुलकीची’ उपक्रमांतर्गत शनिवारी सौ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी कणेरी येथील सिद्धगिरी मठास भेट देऊन ब्लँकेट वाटप करण्यात आले. अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामीजी यांनी मठावर राबविण्यात येणार्‍या योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तेजराज योगेश जाधव, मठाचे कार्यकारी संचालक आर. डी. शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एस. राजे प्रमुख उपस्थित होते.

भारतामध्ये इंग्रजी राजवटीपूर्वी जी प्राचीन शिक्षण पद्धत राबविली जात होती. तीच शिक्षण पद्धत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मठावर चालू आहे. चौदा कला आणि चौसष्ट विद्या विद्यार्थ्यांना आत्मसात व्हाव्यात, या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. त्याचे प्रात्यक्षिके आनंद आश्रम तसेच गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दाखविली. यामध्ये डोळ्याला पट्टी बांधून रंग, चित्र ओळखणे तसेच हातावर नारळ ठेवून नजरेने तो नारळ पाडणे, मनःशांती करून समोरील व्यक्तीच्या मनातील भाव जाणणे व धनुर्विद्या व योगाची अशी विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. ही प्रात्यक्षिके पाहून सौ. स्मितादेवी जाधव यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.

प्रस्ताविकामध्ये आर. डी. शिंदे यांनी टोमॅटो एम.एम.94.3 अंतर्गत ‘ऊब अपुलकीची’ उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार काढले. अमित हुक्केरी यांनी मठावर चालविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. प्रिया शिंदे, विक्रम पाटील, नितीश दाभोळकर आदींसह मठावरील आनंद आश्रम व गुरुकुलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.