Fri, Jul 19, 2019 07:40होमपेज › Kolhapur › वस्त्रोद्योगनगरी समस्यांच्या चक्रव्यूहात!

वस्त्रोद्योगनगरी समस्यांच्या चक्रव्यूहात!

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 11:39PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखली जाणारी वस्त्रोद्योगनगरी इचलकरंजी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त झाली असून, लवकरात लवकर या समस्या सोडविण्याचा प्रयत्न झाला नाही, तर हे दुखणे बळावत जाण्याचा धोका आहे. या शहरासाठी एक वेगळा आणि स्वतंत्र पॅटर्न राबवून इचलकरंजीच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे.

वस्त्रोद्योगातील तेजी-मंदीचा येथील कारखानदारांना आणि कामगारांनाही सातत्याने सामना करावा लागतो. याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. अत्यंत दूषित आणि विषारी पाणी म्हणून इचलकरंजीच्या पाण्याचा राज्यभर दुर्लौकिक झाला आहे. सध्या वारणेतून पाणी उचलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या योजनेचे भवितव्यही चांगले नाही.

शहरातील आरोग्य समस्या भयावह आहेत. दरवर्षी काविळीसारखी साथ तर पाचवीलाच पुजलेली आहे. नगरपालिकेची आरोग्य यंत्रणा असून नसल्यासारखी आहे. शहरभर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांतून नगरपालिकेच्या आणि शासनाच्या जागासुद्धा सुटलेल्या नाहीत. यापैकी बहुतेक अतिक्रमणांना स्थानिक राजकीय नेत्यांचे अभय असल्यामुळे ही अतिक्रमणे हटविणे दुरापास्त होऊन बसले आहे.

खासगी आणि बेकायदा सावकारी हा इचलकरंजी शहराला जडलेला एक रोग म्हणावा लागेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात ती बळावली आहे. वस्त्रोद्योगाच्या तेजी-मंदीत अडकलेले अनेक कारखानदार आणि मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग खासगी सावकारीच्या जाळ्यात अडकला आहे. या सावकारीला स्थानिक राजकीय नेते आणि पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याने ती वाढतच चालली आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे. बेरोजगार तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थीसुद्धा गुन्हेगारी वर्तुळात ओढले जात आहेत. शहरात नित्यनव्या गुन्हेगारी कारवायांना ऊत आलेला आहे. खंडणीसारखे प्रकार रुजत चालले आहेत. महाविद्यालयांचा परिसर गुन्हेगारीच्या शिरकावामुळे भयग्रस्त झाल्याचे दिसत आहे. महाविद्यालयीन तरुणींची सुरक्षितता हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.

नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा खालावल्यामुळे खासगी शाळांचे पेव फुटले आहे. या खासगी शाळांची फी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असूनसुद्धा कर्ज काढून का होईना, लोक आपल्या मुलांना खासगी शाळांत पाठवत आहेत. ही शैक्षणिक अवस्था चिंताजनक आहे. शहराचा प्रचंड मोठ्या वेगाने विस्तार होत आहे. मात्र, या विस्ताराला कोणताही सुसूत्रपणा आणि धरबंद राहिलेला नाही. विस्तारित भागाला सुविधा पुरविताना आताच पालिका घायकुतीला आली आहे, तर भविष्यात काय होईल त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही.

इचलकरंजी शहरातील अनेक भागांमध्ये फोफावलेला छुपा आणि उघड वेश्या व्यवसाय चिंताजनक आहे. काही उच्चभ्रू आणि सुशिक्षित वस्ती असलेल्या भागातही वेश्या व्यवसाय हात-पाय पसरत चालला आहे. शहराचा विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्या वेगाने शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने दिवसेंदिवस बेरोजगारांचे तांडे वाढत आहेत आणि त्यातून वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.