Thu, Jan 23, 2020 04:38होमपेज › Kolhapur › स्वाती यवलुजे होणार नूतन महापौर

स्वाती यवलुजे होणार नूतन महापौर

Published On: Dec 19 2017 1:58AM | Last Updated: Dec 19 2017 1:41AM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी सत्ताधारी काँग्रेसच्या वतीने सौ. स्वाती सागर यवलुजे व विरोधी भाजपतर्फे सौ. मनीषा अविनाश कुंभार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील व ताराराणी आघाडीकडून कमलाकर भोपळे यांनी अर्ज भरले. निवडीसाठी शुक्रवारी महासभेत मतदान होईल. सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्याने यवलुजे व पाटील यांची निवड निश्‍चित आहे. सौ. हसिना फरास व अर्जुन माने यांनी महापौर-उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक लागली आहे. त्याअंतर्गत महापालिकेत नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 

महापौरपदासाठी काँग्रेस व भाजपतर्फे प्रत्येकी एक, तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीच्या वतीने प्रत्येकी एक अर्ज भरण्यात आला. यवलुजे यांच्या अर्जाला प्रवीण केसरकर सूचक असून संदीप नेजदार अनुमोदक आहेत. कुंभार यांच्या अर्जाला शेखर कुसाळे सूचक असून आशिष ढवळे अनुमोदक आहेत. पाटील यांच्या अर्जाला सूचक म्हणून मुरलीधर जाधव व अनुमोदक सूरमंजिरी लाटकर आहेत. भोपळे यांच्या अर्जाला अजित ठाणेकर सूचक असून सुनंदा मोहिते अनुमोदक आहेत.

ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौरपद राखीव असल्याने काँग्रेसमधून यवलुजे यांच्यासह उमा बनछोडे, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर इच्छुक होते. सर्व जण पदासाठी आग्रही असल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली होती. काँग्रेस नेते आ. सतेज पाटील यांनी रविवारी काँग्रेस कमिटीत चारही इच्छुकांच्या मुलाखती घेऊन नगरसेवकांची मते आजमावली होती. त्यांनतर निर्णय राखून ठेवत सोमवारी नाव जाहीर करण्याचा निर्णय दिला होता. त्यानुसार महापौरपदासाठी यवलुजे यांना संधी देण्यात आली.

काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, मावळते उपमहापौर अर्जुन माने, सभागृह नेता प्रवीण केसरकर यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक दुपारी सव्वाचार वाजता महापालिकेत आले. तोपर्यंत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील, माजी महापौर आर. के. पोवार व शहराध्यक्ष राजू लाटकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, नगरसेवक मुरलीधर जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवकही आले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसह सर्वांनी एकत्रित यवलुजे व पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरले. यावेळी मधुकर रामाणे, मोहन सालपे, भूपाल शेटे, सूरमंजिरी लाटकर आदी उपस्थित होते. भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता किरण शिराळे यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.