Sat, Jul 20, 2019 11:10होमपेज › Kolhapur › साखर कारखानदारीसमोरील अडचणीबाबत गुरुवारी बैठक

साखर कारखानदारीसमोरील अडचणीबाबत गुरुवारी बैठक

Published On: Dec 25 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 1:14AM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः प्रतिनिधी

साखरेचे दर कोसळत असल्याने निर्माण झालेल्या अडचणीबाबत आणि त्यावरील पर्यायांचा विचार करण्यासाठी गुरुवारी (दि. 28) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखानदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामधामवर ही बैठक होणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी पत्रकात ही माहिती दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, गेल्या दीड महिन्यांत साखरेच्या दरात प्रतिक्िंवटल 500 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे मूल्यांकन घटून दहा टक्के उतारा असणार्‍या उसाला प्रतिटन 1850 रुपये उपलब्ध होत आहेत. 12.50 टक्के उतारा धरून बगॅस, मोलॅसिस यांची जमा होणारी रक्कमसुद्धा एफआरपीसाठी पुरत नाही. तोडणी, वाहतूक, प्रोसेसिंग खर्च इत्यादीसाठी  पैसे उपलब्ध होणे अवघड आहे. त्यामुळे कारखानदार संकटात आले असल्याचे गार्‍हाणे आ. मुश्रीफ यांच्यासमोर मांडण्यात आले. रविवारी काही कारखानदारांनी आ. मुश्रीफ यांची भेट घेऊन याबाबत तोडगा काढण्याबरोबरच जिल्हा बँकेने 15 ऐवजी 10 टक्के मार्जिन करावे, अशी मागणी केली.

कारखानदारांच्या भेटीनंतर आ. मुश्रीफ यांनी तातडीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. साखर दरातील घसरणीमुळे निर्माण झालेली समस्या त्यांच्याकडे मांडली आणि त्यावर पर्यायासाठी बैठक घेण्याबाबत सूचित केले. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी बैठक घेण्याचे मान्य केल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.