Tue, Jul 16, 2019 01:41होमपेज › Kolhapur › ईएसआय हॉस्पिटल तातडीने सुरू करा

ईएसआय हॉस्पिटल तातडीने सुरू करा

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 26 2017 11:18PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

ईएसआय हॉस्पिटलची कामगारांसाठी असणारी आरोग्य सेवा तत्काळ सुरू करा, अशी मागणी सर्व श्रमिक संघ, मेकॅनिकल अँड इंजिनीअर कामगार युनियन व मेनन अँड मेनन कामगार कर्मचारी संघटना यांच्या वतीने करण्यात आली. ईएसआय हॉस्पिटलवर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी एसटी महामंडळ खासगीकरण रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली. दरम्यान, ईएसआय हॉस्पिटलचे अतिरिक्त आयुक्त गणुशेखरन यांनी 1 एप्रिलपासून कामगारांसाठी आरोग्य सुविधा देण्याचे आश्‍वासन दिले. सकाळी विक्रम हायस्कूल येथून मोर्चाला प्रारंभ झाला. एसटी स्टँड मार्गे मोर्चा धैर्यप्रसाद हॉलमार्गे ईएसआय हॉस्पिटलवर नेण्यात आला. मोर्चाच्या वतीने केंद्रीय जीवन बिमा निगमच्या अधिकार्‍यांना निवेदन  देण्यात आले.

 निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने ईएसआय हॉस्पिटल सुरू केले; पण अजून त्याबाबतच्या सुविधा कामगारांना मिळत नाहीत.  हजारो कामगारांच्या वेतनांतून पैसे कपात करण्यात येतात. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना लाखो रुपये खर्च करून महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात. अनेक वेळा कामगारांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून किमान आवश्यकतेनुसार रक्तदाब चाचणी करण्यात यावी, कामगारांसाठी असणार्‍या गावामध्ये विम्याचे डॉक्टर्स त्वरित नेमण्यात यावेत. सध्या सुरू असलेल्या इस्पितळात तत्काळ सुविधा देण्यात याव्यात. हॉस्पिटलमध्ये ओपीडी व कॅज्युअल्टी सुरू करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

अधिकार्‍यांनी 5 जानेवारीपर्यंत मान्यताप्राप्त ईएसआय डॉक्टर व संघटनेच्या समितीची बैठक घेऊन डॉक्टर्सना कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मधुमेह औषधे देण्याबाबत सूचना देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. 1 एप्रिल 2018 पासून स्पेशल ओपीडी सुरू करण्यात येईल, लॅब व कॅज्युअल्टी विभागही तत्काळ सुरू होईल, महाराष्ट्र व कर्नाटकात काम करणार्‍या कामगारांना सेवा मिळावी, यासाठी पुणे व बेंगलोर येथील कार्यालयांशी पत्रव्यवहार केला जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, एसटी महामंडळाच्या खासगीकरणाला विरोध करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. याबाबतचे निवेदन एसटीच्या अधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी ईएसआय हॉस्पिटलचे अतिरिक्त आयुक्त ईएसआय कॉर्पोरेशन गुणशेखरन, कोल्हापूरचे प्रभारी मेडिकल सुप्रिटेंडंट सुनील झोंडे, निदेशक  विलास वाघमारे उपस्थित होते. आंदोलनात कोल्हापूर एमआयडीसी कामगार संघटनेचे कर्मचारी सहभागी झाले होेते.