Thu, Jul 18, 2019 16:56होमपेज › Kolhapur › शहरातील १०८ जीवघेणे स्पीडब्रेकर बनले सुरक्षित

शहरातील १०८ जीवघेणे स्पीडब्रेकर बनले सुरक्षित

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 26 2017 11:53PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जनसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी कायमच रस्त्यावर उतरण्याचा शेतकरी कामगार पक्षाचा वारसा आता त्यांचीच एक शाखा असलेल्या युवा आघाडीनेही तितक्याच नेटाने पुढे सुरू ठेवला आहे. आंदोलने करून जनतेला वेठीस धरण्यापेक्षा स्वत:च त्या प्रश्‍नांशी भिडून प्रश्‍न निकाली काढण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे काम शेकापच्या युवा आघाडीने केले आहे. जीवघेणे ठरलेले शहरातील प्रमुख मार्गांवरील तब्बल 108 स्पीड ब्रेकर रंगवून देत या युवकांनी जीवघेणे स्पीडब्रेकर सुरक्षित केले आहेत. शहरातील वाहतुकीचा वेग नियंत्रित राहावा म्हणून प्रशासनातर्फे महत्त्वाच्या मार्गावर स्पीडबे्रकर तयार करण्यात आले आहेत. पण या स्पीडबे्रकरवर पट्टेच नसल्यामुळे अंधारात राहू दे दिवसाही ते स्पष्टपणे दिसत नाहीत. यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले  होते.

 वारंवार याबाबतीत विचारणा करून महापालिका अथवा पोलिस प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर शेकापच्या युवा आघाडीनेच यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले, असे शेकापचे स्वप्निल पाटोळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. स्पीडब्रेकरवर पट्टेे मारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निधी देण्याची गरज आहे. प्रशासनाने यासंबंधी तातडीने टेंडर काढून उर्वरित स्पीड ब्रेकर्सही रंगवावेत, अशी मागणीही केली. 
सरचिटणीस बाबुराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष स्वप्निल पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दहा दिवस रोज रात्री साडेदहा ते दोन या वेळेत ही युवा आघाडी रस्त्यावरील स्पीडब्रेकरवर पट्टे मारण्याचे काम करत होती.  राजेंद्र कोतमिरे, सुशांत बोरगे, संग्राम माने, अतुल कांबळे, गौरव जाधव, सोनू मोरे, भैया शेख, मधुकर हरेल, उज्वला कदम या टीमने थंडीची पर्वा न करता रात्री स्वखर्चाने पांढरा रंग, ब्रश आणून या स्पीडब्रेकरवर पट्टेे  मारले.