Mon, Jun 17, 2019 02:52होमपेज › Kolhapur › सोशल मीडियावर अफवांचे ‘वर्ष’

सोशल मीडियावर अफवांचे ‘वर्ष’

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 26 2017 11:41PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

सोशल मीडिया हे थेट संवाद आणि संपर्काचे सर्वात चांगले माध्यम बनले असले तरी दुसर्‍या बाजूला यंदा अफवांनीसुध्दा या माध्यमावर थैमान घातले होते. जिवंतपणीच अनेक सेलिब्रेटींना श्रध्दांजली वाहण्यात आली तर दंगल झाल्याचे चुकीचे व्हिडीओसुध्दा पसरवण्यात आले. अनेक अधिकार्‍यांची बदली तर राजकीय क्षेत्रात पक्षांतरांच्या अफवांचाही बोलबाला दिसून आला. यंदाच्या सरत्या वर्षात सोशल मीडियावरील अफवा हे धोकादायक प्रकरण दिसून आले. संबंधित मेसेज ही अफवा होती, असे खुलासा झाल्यानंतर या गोष्टींनी मनोरंजन झाल्यासारख्या चर्चांनाही ऊत आला.  

सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी आल्या तर त्याचे परिणाम भयंकर होतात, याचा अनुभव यंदा नेटिझन्सनी सातत्याने घेतला. या अफवा प्रकरणांमुळे कारण नसताना नागरीक त्रस्त झाले तर पोलिसांसारख्या यंत्रणेची विनाकारण तारांबळ उडाली. ज्येष्ठ अभिनेत्यांच्या निधनाचे मेसेज तर सर्वाधिक फिरले. बडा नेता अमूक एका पक्षात दाखल होणार आणि राजकीय क्षेत्रात उलथापालथ होणार, अशा संदेशानाही ऊत आला. सण-उत्सवाच्या काळात परदेशातील तसेच जूने व्हिडीओंचा संदर्भ देत दंगल झाल्याच्या अफवाही पसरल्या. अशा अफवांमुळे नागरिक भयभीत झाले तर जबाबदार यंत्रणांची धावपळ उडाली. यामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या.

खात्रीनंतर अफवा असल्याचे समजल्यावर लोकांनी सोशल मिडियावरील या अतिउथळ आणि अतिरेकी प्रवृत्तीविरोधात निषेध व्यक्त केला. फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप यावर सर्वात जास्त अफवा पसरवल्या जात होत्या.  अपघातामुळे अमुक घाट बंद अशा अफवांनी अनेकांनी नियोजित सहली रद्द केल्या होत्या तर काहींनी पर्यायी मार्गाने वाहतूक केली. या अफवा आहेत हे सांगण्यासाठी पाच ते सहा तास इतका कालावधी लागल्याने बहुतेकांचे मोठे नुकसान झाले. प्रसिध्द अभिनेता, अभिनेत्री या ठिकाणी येणार आहे अशा अफवांनी तर एप्रिल फुल बनाया! असे फुलीश प्रकार घडले.