Mon, May 27, 2019 07:03होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : जात पडताळणी समितीचा कारभार संथगतीने

कोल्‍हापूर : जात पडताळणी समितीचा कारभार संथगतीने

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 11:38PMकोल्हापूर : संग्राम घुणके

शैक्षणिक प्रवेश, निडणुकीतील उमेदवारी, नोकरीत जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते; मात्र हे प्रमाणपत्र देणार्‍या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाची मदार ही रोजंदारी कर्मचार्‍यांवरच अवलंबून आहे. रोजंदारीवरील व अपुरे कर्मचारी, प्रस्तावातील त्रुटी यामुळे प्रमाणपत्र वेळेत मिळण्यात काही वेळेस जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात दिरंगाई होते. कोल्हापूर जात प्रमाणपत्र पडताळणी  कार्यालयात कनिष्ठ कर्मचार्‍यांत 2 लिपिक, स्टेनो व 1 शिपाई अशा केवळ चार कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर रोजंदारीवरील कर्मचारी 6 आहेत. सांगली कार्यालयात केवळ 1 लिपिक कायमस्वरूपी आहेत. सातारा येथे 1 कनिष्ठ व 1 वरिष्ठ लिपिक असे दोनच कर्मचारी आहेत. या विभागातील काही कर्मचारी 10 वर्षे रोजंदारीवर काम करीत आहेत. 

जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव घेणे, तो तपासणे, अधिकार्‍यांना सादर करणे, फाईल सही होऊन आल्यावर व्हॅलडिटीची प्रिन्ट तयार केली जाते. प्रिन्ट तयार केल्यानंतर परत अधिकार्‍याकडे सहीसाठी जाते. त्यानंतर प्रमाणपत्रधारकाला त्याचे वाटप होते. या प्रक्रियेत बहुतांश टप्प्यांवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील कर्मचारी आहेत. अनेकदा या रोजंदारीवरील कर्मचार्‍यांकडून बनावट सर्टीफिकेटचे वाटप झाले आहे. 2012 सालात कोल्हापुरात असे झाले आहे. तसेच अकोला, पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर  आदी ठिकाणीही असे झाले आहे. एखाद्या नियमित कर्मचार्‍याने काही घोळ घातल्यास त्याची खातेअंतर्गत चौकशी होते. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम त्याला लागू असतात. त्यामुळे गैरप्रकार करण्यास कायम कर्मचारी शक्यतो धजावत नाहीत. याउलट, रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना असे नियम लागू होत नाहीत. त्याला बडतर्फ करणे अशीच कारवाई होते. कायम कर्मचार्‍यांची 3 वर्षांनी बदली होते. तर, रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची बदली होत नाही. 

प्रस्ताव दाखल करून घेताना सत्य प्रमाणणपत्रे व त्याची ट्रू कॉपी आहे का, हे महत्त्वाचे असते, शासनाचा माणूस प्रस्ताव घेताना याबाबत हलगर्जीपणा करीत नाही. अनेक रोजंदारीवरील कर्मचार्‍यांचे काम चांगले आहे. पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी दिवसाला 200 च्या आसपास जात प्रमाणपत्रांसाठी प्रस्ताव दाखल होतात. या तसेच कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी प्रस्तावांचे प्रमाण अधिक असून कामात गती येण्यासाठी कायम कर्मचारी वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

यावर्षी शैक्षणिक प्रवेशासाठी जून व जुलैै महीन्यांत 2625 प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी 1544 प्रस्तावधारकांना प्रमाणपत्र मिळाले. 1061 प्रस्ताव प्रलंबित आहेत. या कालावधीतच कर्मचार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात लागते. 

जुलै 2018 अखेर 1410 प्रस्ताव प्रलंबित  

विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर कार्यालयाचे  2016 मध्ये विभाजन झाले. जिल्हावार समित्या झाल्या. मार्च 2016 ते मार्च 2017 या कालावधीत 17620 प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी 15 हजार 742 प्रस्ताव निकाली निघाले व 1872 प्रलंबित राहिले. एप्रिल ते डिसेेंबर 2017 या कालावधीत 12, 366 प्रस्तावांपैकी 9192 प्रस्ताव निकाली निघाले. 3173 प्रस्ताव प्रलंबित राहिले. जानेवारी ते जुलै 2018 या कालावधीत 8353 प्रस्ताव दाखल झाले. त्यापैकी 6743 प्रस्ताव निकाली निघाले. जुलै (2018) अखेर 1410 प्रस्ताव प्रलंबित आहेत. विभाजनामुळे प्रस्तावांची संख्या कमी झाली आहे. तसेच नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्याची जिल्ह्यात सोय झाली आहे.