कोल्हापूर : प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेच्या नगरीत सर्व जातीधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत असताना काही समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद पुन्हा उमटू नयेत यासाठी झाले गेले विसरू आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे हातात हात घालून पुढे जाऊ, असा समतेचा संदेश शिवाजी पेठेने सामाजिक सलोखा आणि शांतता मेळाव्यात रविवारी दिला. यावेळी दलित-सवर्ण दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना तिळगूळ देऊन सामाजिक समतेचा संदेश दिला.
भीमा कोरेगावमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी तरुण मंडळाने सामाजिक सलोखा आणि शांतता मेळाव्याचे आयोजन केले होते. कोल्हापुरातील घटना बाहेरून आलेल्या काही समाजकंटकांनी केली असून, त्यामुळे कोल्हापूरच्या परंपरेस गालबोट लागले. कोल्हापूरवर लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी पूर्वी ज्याप्रमाणे आपण सर्व जातीधर्मांच्या मंडळींनी बंधुभावाने राहण्याचा संकल्प करू या, असे आवाहन केले. बाबरी विध्वंसानंतर संपूर्ण देश जातीय दंग्यात पेटत असताना कोल्हापुरात मात्र सामाजिक, धार्मिक सलोखा होता. हे केवळ राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या समतेच्या आणि परिवर्तनाच्या विचारानेच होऊ शकले.हीच वैचारिक परंपरा यापुढेही अशीच कायम राखू या, अशी भूमिका अनेकांनी मांडली.
पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी कोल्हापुरातील सकारात्मक आणि परिवर्तनाच्या आठवणी सांगितल्या. कोल्हापूरकर सतत शाहू महाराजांचे नाव घेतात; मात्र आपण त्यांच्या विचाराने खरंच जात आहोत की केवळ टाळ चिपळ्या घेऊन त्यांच्या गुणांचे गोडवे गाण्याचे काम करीत आहोत. याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. आता यापुढे जुन्या जाणत्या लोकांच्या हातात सारी सूत्रे सोपविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काही बिघडणार नाही आणि बिघडलेले दुरुस्त होण्यास मदत होईल. पोलिस केवळ समाजमन निकोप राहील, याची दक्षता घेत असतात.
शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण म्हणाले, शिवाजी पेठेने परिवर्तनाचा संदेश देण्याची परंपरा जोपासली आहे. आ. चंद्रदीप नरके म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची दिशा राजर्षी शाहू महाराजांनी दिली आहे. मूठभर लोकांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची ओळख करून देण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. कोल्हापूरची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करू या. पोलिसांनी निरपराध लोकांवर कारवाई करू नये, अशा घटनांमुळे शाहूनगरीस काळिमा लागू नये, ही दक्षता घेऊ या, असे आवाहन प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले.
विक्रम जरग यांनी असे कार्यक्रम शहरात विविध भागांत घेण्याची सूचना मांडली. शिवाजी जाधव म्हणाले, जातीधर्मांचे राजकारण करून प्रगती थांबते, याची जाणीव सर्वांना करून दिली पाहिजे. अजित राऊत म्हणाले, दगडफेक आणि तोडफोडीने शाहूंचा अपमान झाला असून, करवीरनगरीची अशी अब्रू घालविणे योग्य नाही. रविकिरण इंगवले म्हणाले, या घटनेने दोन्ही समाजांत तेढ निर्माण केली आहे. शिक्षणाचा अभाव असल्याने अशा घटनांना खतपाणी मिळत आहे.
कॉ. चंद्रकांत यादव म्हणाले, कोल्हापुरात घडलेला सामाजिक संघर्ष आहे. असा प्रसंग का घडला याचा विचार केला पाहिजे. पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशात अमृतकर म्हणाले, शिवाजी पेठ शहराचे नाक आहे. सामाजिक सलोख्याचा उपक्रम स्तुत्य आहे. एकोपा राखण्यात पोलिसांपेक्षा नागरिकांचे कौतुक आहे. आरपीआयचे उत्तम कांबळे म्हणाले, दोन्ही समाजांची वीण शाहूंच्या विचाराने विणली पाहिजे. कोल्हापुरात घडलेली घटना वाईट स्वप्न होते. त्याचा पुन्हा उल्लेख आणि विचार न करता पुढे वाटचाल करू या.
यावेळी प्रा. विश्वास देशमुख, सुनीता पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास प्रा. शहाजी कांबळे, सोमनाथ घोडेराव, चंद्रकांत साळोखे, बबन कोराणे, अजित नरके, बाजीराव चव्हाण, विवेक महाडिक, रवींद्र आवळे, बाळासाहेब भोसले, बाजीराव नाईक सुभाष देसाई, आनंदराव ठोंबरे, शिरीष कणेरकर, इंद्रजित बोंद्रे, उत्तम कोराणे उपस्थित होते. सुरेश जरग यांनी सूत्रसंचालन केले. लालासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.