Wed, Apr 24, 2019 07:54होमपेज › Kolhapur › शालिनी सिनेटोनचा फेरप्रस्ताव ; आयुक्त

शालिनी सिनेटोनचा फेरप्रस्ताव : आयुक्त

Published On: Dec 30 2017 1:57AM | Last Updated: Dec 30 2017 1:57AM

बुकमार्क करा
कोल्हापूर ः प्रतिनिधी

कोल्हापुरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोनसाठी भूखंड राखीव ठेवण्याचा प्रशासनाचा नामंजूर केलेला प्रस्ताव फेरप्रस्ताव म्हणून दाखल करण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने येत्या महासभेपुढे फेरप्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. सभागृहाने सर्वानुमते नामंजूर केलेल्या प्रस्तावावर काही दिवसांपूर्वी महापौर हसिना फरास यांची सही झाली होती. महापौर कार्यालयाकडून नगररचना विभागाकडे प्रस्ताव आल्यानंतर शुक्रवारी तो पुढील कार्यवाहीसाठी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला. दरम्यान, महापालिकेतील कारभार्‍यांनी नगररचना विभागातील अधिकार्‍यांच्या संगनमताने ढपला पाडण्यासाठी हा प्रस्ताव तयार करून घेतला आहे.

त्यासाठी सुमारे दोन कोटींची सुपारी  फुटल्याची चर्चा आहे. परिणामी नगरसेवकांना अंधारात ठेवून प्रशासनाचा प्रस्ताव नामंजूर करून घेतल्याचे सांगण्यात येते. सुपारीची वाच्यता झाल्यानंतर काही नगरसेवकांनी ऐतिहासिक वास्तुची जागा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. सभागृहाने नामंजूर केलेला प्रस्ताव फेरप्रस्ताव म्हणून सादर करावा किंवा तो विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अखेर कारभार्‍यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या 47 नगरसेवकांचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. त्याबरोबरच भाजप-ताराराणी आघाडीनेही स्वतंत्रपणे निवेदन देऊन फेरप्रस्ताव सादर करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांनी कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती.