Mon, Jun 24, 2019 16:39होमपेज › Kolhapur › शालिनी सिनेटोनचा फेरप्रस्ताव सादर करा

शालिनी सिनेटोनचा फेरप्रस्ताव सादर करा

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 12:16AM

बुकमार्क करा
कोल्हापूर ः प्रतिनिधी 

शालिनी सिनेटोनचा महापालिका सभागृहाने नामंजूर केलेला प्रस्ताव फेरप्रस्ताव म्हणून सादर करावा, अशी विनंती सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे बुधवारी केली. शिवसेनाही त्यांच्यासोबत आहे. भाजप-ताराराणी आघाडीनेही स्वतंत्रपणे आयुक्तांकडे भेटून मागणी केली. विशेष म्हणजे 12 डिसेंबरला झालेल्या महासभेत सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह विरोधी भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनाने दाखल केलेला प्रस्ताव आवाजी मताने नामंजूर केला होता. आता आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले की, कायदेशीर बाबी तपासण्यात येतील.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एक द्वितीयांश म्हणजेच 41 नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र देतो, असे सांगितले आहे. परंतु, एकदा सभागृहात नामंजूर झालेला प्रस्ताव सभागृहाबाहेर अशा पद्धतीने मंजूर करता येईल का? हे पाहिले पाहिजे. त्याबरोबरच नामंजूर प्रस्ताव राज्य शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठविता येईल का? किंवा फेरप्रस्ताव सादर करावा का? आदीबाबत कायदेशीर माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी व विरोधी पक्षनेता किरण शिराळे यांनी आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, 12 डिसेंबरला महासभा उशिरा सुरू झाली. तसेच सभेला विरोधी पक्षनेता व गटनेते गैरहजर होते.

परंतु, मागील दोन्ही सभेत हा विषय आला असता ऑफिस प्रस्तावानुसार मंजूर करण्याबाबत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सूचना दिल्या होत्या. मात्र, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने हा प्रस्ताव घाईगडबडीने नामंजूर केला. परंतु, प्रशासनाने हा प्रस्ताव फेरप्रस्ताव म्हणून सादर करावा, अन्यथा राज्य शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवावा, असेही निवेदनात म्हटले आहे.  शालिनी सिनेटोनच्या संपूर्ण जागेतील भूखंड क्र. 5 व 6 हे सिनेटोनसाठीच राखीव ठेवण्याचे हमीपत्र संबंधितांनी दिले आहे. त्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दाद मागणार नसल्याचे संबंधितांनी म्हटले आहे. त्यामुळे ही जागा महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट होते. तरीही नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी नव्याने प्रस्ताव करण्याचे कारणच काय? बांधकाम व्यावसायिकाचा फायदा करून देण्यासाठीच खोत यांनी प्रस्ताव तयार केल्याचा आरोप करून नगरसेवक भूपाल शेटे यांनी खोत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. 

शालिनी सिनेटोनचा भूखंड वाचवा

अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाची आयुक्तांकडे मागणी कोल्हापुरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोनचा भूखंड वाचवा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने बुधवारी केली. तसेच संस्थान सनदअन्वये आणि महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रान्वये शालिनी सिनेटोनचा भूखंड आरक्षित असतानाही ते आरक्षण उठविण्याचा कुटिल डाव करणार्‍या कारभार्‍यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली.

आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेतील काही कारभार्‍यांनी शालिनी सिनेटोन भूखंडावरील आरक्षण उठवून चित्रपटकला गाडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, शालिनी सिनेटोनचा भूखंड पूर्वीप्रमाणेच चित्रपटसृष्टीसाठीच आरक्षित ठेवावा. शिष्टमंडळात महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर, अरुण चोपदार, विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर, खजिनदार शरद चव्हाण, रणजित जाधव, नगरसेविका सुरेखा शहा, मिलिंद अष्टेकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, इम्तियाज बारगीर उपस्थित होते.