Sun, Jun 16, 2019 03:00होमपेज › Kolhapur › शालिनी सिनेटोन सुपारीचे केंद्र टीपी

शालिनी सिनेटोन सुपारीचे केंद्र टीपी

Published On: Dec 30 2017 1:48AM | Last Updated: Dec 30 2017 1:48AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : सतीश सरीकर

शालिनी सिनेटोनसंदर्भात सदस्य ठराव महापालिका सभागृहात नगरसेविका सुरेखा शहा व अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी मांडला होता. सर्वानुमते तो मंजूरही झाला; मात्र हाच ठराव कारभारी व संबंधित बिल्डरला अडचणीचा ठरू लागला. परिणामी, टीपीतील (नगररचना अर्थात टाऊन प्लॅनिंग विभाग) अधिकार्‍यांना हाताशी धरून कारभार्‍यांनी ‘त्या’ ठरावाला बगल देण्याचा ‘प्लॅन’ केला. त्यातूनच अधिकार्‍यांनी शालिनी सिनेटोनचा प्रस्ताव तयार केला. त्यात शब्दांची फिरफिरवी करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाचा प्रस्ताव नामंजूर करून पूर्वीचा मंजूर ठराव मोडून काढण्यात आला.   

शहा व लाटकर यांनी 20 जुलै 2017 ला दिलेल्या ठरावात शालिनी सिनेटोनच्या जागेवर कोणतेही बांधकाम किंवा इतर व्यवसाय करण्यास महापालिकेने परवानगी देऊ नये, असे म्हटले आहे. सभागृहात मंजूर झालेल्या त्या ठरावाच्या आधारे टीपी विभागाच्या अधिकार्‍यांनी कार्यवाही करणे आवश्यक होते. कारण, ही वास्तू किंवा तेथील परिसरात कोणतेही कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा व्यवसाय होऊ नयेत, अशीच शहरवासीयांची भावना आहे. तो ऐतिहासिक परिसर जपण्यासाठी सर्व जण प्रयत्नशील आहेत; परंतु टीपी विभागातील अधिकार्‍यांना किंवा कारभार्‍यांना त्याचे काहीही देणेघेणे नाही. बिल्डरने कारभार्‍यांना हाताशी धरून खेळी रचली. त्यात कारभारी व टीपीतील अधिकार्‍यांनी शांत डोक्याने बसून प्रस्तावातील एक आणि एक शब्द आखला. कुणालाही त्याबाबत शंका येणार नाही, असा प्रस्ताव तयार केला.  

आजपर्यंत मंजूर ठरावावरच मलई असते, असा सर्वांचा समज आहे. गेल्या काही वर्षांतल्या मनपातील कारभार्‍यांच्या कारभारारून ते अधोरेखितही झाले आहे. त्यामुळे सामान्य नगरसेवक लांबच, काही चाणाक्ष नगरसेवकांनाही त्या प्रस्तावाविषयी शंका आली नाही. परिणामी, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी भाजप-ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्याही नगरसेवकांनी नामंजूर करण्यात हातभार लावला; परंतु नामंजूर ठरावाला पहिल्यांदाच कोटीमोलाची किंमत आली. नगरसेवकांच्या लक्षात ही बाब येईपर्यंत कारभारी कोटी-कोटींवर हात मारून रिकामे झाले होते. नंतर हळूहळू गुपिते बाहेर पडू लागल्यावर त्याची वाच्यता होऊ लागली. त्यामुळे 40 लाखांची सुपारी सांगून प्रत्येक नगरसेवकाच्या हातात 38 हजार 800 रुपयांचे पाकीट टेकविण्यात आले. प्रत्यक्षात, कारभार्‍यांनी मोठा ढपला पाडला. काही कारभार्‍यांनी त्या जागेतही हिस्सा घेतला असल्याची चर्चा आहे.

हमीपत्र दिले असतानाही प्रस्ताव का?

शालिनी सिनेटोनच्या जागेवर संकुल उभारण्याच्या रेखांकनास अंतिम मंजुरी देताना संबंधित बिल्डरने महापालिकेला हमीपत्र दिले आहे. त्यानुसार भूखंड क्र. 5 व 6 वर ‘अ‍ॅमेनिटी ओपन स्पेससह’ असा उल्लेख आहे. त्या भूखंडाचा अन्य कोणत्याही कारणासाठी वापर केल्यास अंतिम रेखांकन मंजुरी रद्द करावी. महापालिकेविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दाद मागणार नाही, असेही संबंधित बिल्डरने हमीपत्रात म्हटले आहे. तरीही टीपी विभागातील अधिकार्‍यांनी संबंधित भूखंड पुन्हा त्याच कारणासाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव का केला, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

ठरावात क्षेत्रफळाचा उल्लेख का नाही?

टीपी विभागाने शालिनी सिनेटोनच्या जागेचा प्रस्ताव तयार केला. त्यात भूखंड क्र. 5 व 6 अशीच नोंद करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात ते भूखंड म्हणजे किती एकरचे किंवा किती चौरस फूट आहे, याचा प्रस्तावात कोठेच उल्लेख नाही. त्यामुळे टीपीतील अधिकार्‍यांनी प्रस्तावात गोलमाल केल्याचे उघड होते. टीपीतील अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक जागेच्या क्षेत्रफळाचा उल्लेख प्रशासकीय प्रस्तावात केला नसल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. 

‘टीपी’त सामान्यांचे हाल

शहरवासीयांच्या बांधकाम परवानगीसह इतर कामांसाठी महापालिकेचा टीपी (नगर रचना म्हणजेच टाऊन प्लॅनिंग) विभाग कार्यरत करण्यात आला. सामान्य माणूस टीपी कार्यालयात येरझार्‍या मारून चप्पल झिजवतो; पण टीपीतील अधिकारी हे बिल्डर व धनाढ्यांची कामे थेट त्यांच्या ऑफिस किंवा घरांत जाऊन करून देतात.