Sun, Mar 24, 2019 12:27होमपेज › Kolhapur › आता पुस्तके पुन्हा  शाळेतच मिळणार 

आता पुस्तके पुन्हा  शाळेतच मिळणार 

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 30 2017 9:10PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या मोफत पाठ्यपुस्तकांसाठी असलेली थेट लाभ हस्तांतरणची (डीबीटी) अट शासनाने रद्द केली आहे. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळास्तरावर विद्यार्थ्यांना नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांसाठी ‘डीबीटी’ योजना लागू केली होती. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाऐवजी पुस्तकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यांत थेट जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची राष्ट्रीयीकृत बँक खाती उघडण्याची घाई शाळांनी केली होती.

बालभारती ही शासन अखत्यारीतील संस्था असल्याने पाठ्यपुस्तक योजना थेट लाभ हस्तांतरण योजनेतून वगळण्याचा प्रस्ताव राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळाने 14 डिसेंबर रोजी शासनाला दिला होता. यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दर्शविली आहे. त्यामुळे मोफत दिली जाणारी पुस्तके आता थेट शाळांत मिळणार आहेत. 
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुरविण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके थेट लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर देण्याच्या सद्यःस्थितीतील योजनेप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक व शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांंनी दिल्या आहेत.