Thu, May 28, 2020 08:43होमपेज › Kolhapur › ‘सॅटर्डे नाईट’ची तरुणाईत धोकादायक क्रेझ!

‘सॅटर्डे नाईट’ची तरुणाईत धोकादायक क्रेझ!

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:12PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

शनिवारी रात्री दहाच्या सुमारास सर्व मित्रांनी एकत्र जमायचे. एक, दोन, तीन म्हणताच फर्रदिशी वेगाने बाईकवरून रायडिंगला जायचे. अधून-मधून एखादा स्टॉप घ्यायचा आणि सगळ्यांनी मिळून रस्त्यावरच बेधुंद नाचायचे. यातील काहीजण चंद्रावरच तरंगत असतातच. रविवारी पहाटे सहाच्या सुमारास ही मंडळी आपापल्या घरी परतात. सध्या सॅटर्डे नाईट ही तरुणाईची धोकादायक क्रेझ सुरू झाली आहे. फुलपाखरांसारखं अलगद जगणं म्हणजे तरुणाई. अल्लडपणा आणि बेधुंदपणा हा ओघानं आलाच, पण या वयात ट्रॅक चुकला तर मात्र गडबड होऊ शकते.

सध्या कोल्हापुरात सॅटर्डे नाईटची क्रेझ मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. बाईकवरून रात्रभर हुंदडणे ही मूळ संकल्पना आहे. एका रात्रीत कोकण, महाबळेश्‍वर आदी ठिकाणी जाऊन परत येणे असा सुरुवातीला प्रवास असायचा; पण आता काही ग्रुप्सकडून मात्र प्रवास हे निमित्त करण्यात आलं आहे. कारण भर रस्त्यात बेधुंद नाच आणि आरडाओरडा हे नवे किळसवाणं स्वरूप सुरू झालं आहे. या सॅटर्डे नाईटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई सामील होत असल्याने काहीजण दोन-चार पेग रिचवून कोम्यात गेल्यासारखे यात सामील होत आहेत.

त्यामुळे त्यांच्याकडून बाईक भरधाव चालवल्या जातात. यामुळे धोक्याची शक्यता वाढते. छोटेमोठे आणि गंभीर अपघातसुद्धा यापूर्वी घडले आहेत. अनेक तरुण पालकांची परवानगी घेऊन यामध्ये सहभागी होत असतात. मात्र, कसलेही नियोजन आणि पूर्वतयारी नसल्याने हा प्रकार भरकटल्यासारखा असतो. तसेच सगळेच तरुण असल्याने मतभेद होण्याचे प्रमाणही वाढत आहे.  मुळात हे प्रकार शोधून काढणे तसे सोपे नाही, पण शनिवारी रात्री शिवाजी युनिव्हर्सिटी चौक, सायबर चौक, मेरी वेदर नजीक, तावडे हॉटेल चौक आदी ठिकाणी हे बायकर्स एकत्र जमतात, पण दरवेळी जागा बदलल्या जात असल्याने त्यांना रोखणेही अवघड दिसते; परंतु गस्तीसाठी असलेल्या पोलिसांना एकत्रित दहा-वीस बायकर्स दिसले की समजावे की सॅटर्डे नाईटसाठी स्वार्‍या निघाल्या आहेत. अशावेळी पोलिसांनी चौकशी करून किमान कायद्याचा बडगा उगारला तर या गोष्टींना चाप बसेल.