होमपेज › Kolhapur › ...अन्यथा एस.टी. कर्मचार्‍यांचा संप अटळ

...अन्यथा एस.टी. कर्मचार्‍यांचा संप अटळ

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 10:59PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

वेतनवाढीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त केलेली उच्चस्तरीय समितीने 15 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम अहवाल सादर करणे अपेक्षित होते; पण तसा अहवाल सादर न केल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटनेने वकिलांमार्फत शासन आणि एस.टी. प्रशासनाला न्यायालयाच्या अवमानप्रकरणी नोटीस दिलेली आहे. आता 22 डिसेंबरपर्यंत  समिती अंतिम अहवाल सादर करणार आहे. या अहवालात समाधानकारक निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा एस.टी. कामगार न्यायालयाने दिलेल्या मुदतीनंतर पुन्हा संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

31 मार्च 2016 च्या मूळ वेतनात 3500 मिळवून होणार्‍या रकमेत 2.57 टक्केनुसार गुणाकार करून जे सुधारित मूळ वेतन असेल ते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार द्यावे, अशी मागणी आहे, असे ते म्हणाले. यावेळी संघटनेचे विभागीय सचिव वसंत पाटील, विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील आदी उपस्थित होते. एस.टी. प्रशासनाकडून अनुकंपा तत्त्वावर नेमणूक केलेल्या, विनंती बदल्या केलेल्या कर्मचार्‍यांची नावे, पद व पत्रव्यवहाराचा पत्ता, अशी माहिती मिळवणे सुरू आहे. यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या प्रकाराने कामगारांत नाराजी वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा संघटनेच्या वतीने न्यायालयात दाद मागावी लागेल, असेही हनुमंत ताटे यांनी सांगितले.