Sat, Feb 23, 2019 22:23होमपेज › Kolhapur › एस.टी. कर्मचार्‍यांचा  गणवेश

एस.टी. कर्मचार्‍यांचा  गणवेश

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 12:09AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

एस.टी.तील कर्मचार्‍यांच्या कामानुसार गणवेश वेगवेगळा असला पाहिजे, असा निर्णय घेऊन प्रशासनाने राज्यातील एस.टी.च्या कर्मचार्‍यांना नवीन गणवेशाचे शनिवारपासून वाटप सुरू केले. येथील मध्यवर्ती बसस्थानकावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रभारी विभाग नियंत्रक एस. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते कर्मचारी व अधिकार्‍यांना गणवेश देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व आगारांतील 90 कर्मचार्‍यांना या गणवेशांचे वाटप करण्यात आले. 

एस.टी.चालकांपासून अधिकार्‍यांपर्यंत आणि कार्यशाळेतील हेल्पर्सपासून मुख्य तंत्र अधिकारी यांच्यापर्यंत नवीन रंगात गणवेश देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार पत्रकारदिनाचे औचित्य साधून शनिवारी गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रभारी विभाग नियंत्रक कुलकर्णी यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्ह्यातील 90 कर्मचार्‍यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. उर्वरित कर्मचार्‍यांना मार्च महिन्यापर्यंत गणवेशाचे वाटप करण्यात येणार आहे, असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. स्वागत आगार व्यवस्थापक सुनील जाधव यांनी केले. कार्यक्रमास सौ. रेश्मा चौगुले, विभागीय वाहतूक अधिकारी अजित मोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पेडणेकर यांनी केले.