Fri, May 24, 2019 02:59होमपेज › Kolhapur › मजूर टंचाई, अडचणीमुळे सिंचन विहिरींना खो

मजूर टंचाई, अडचणीमुळे सिंचन विहिरींना खो

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 30 2017 10:39PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : संग्राम घुणके

लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी असणार्‍या अनेक अटी, ऊस उत्पादक पट्टा, जोडीला दुग्धव्यवसाय, औद्योगिक वसाहती यामुळे सधन असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला मजूर टंचाई जाणवत आहे. यामुळे जिल्ह्यात सिंचन विहिरींच्या कामात अडसर ठरत असून गेल्या तीन वर्षांत अवघ्या  198 सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. शेतकर्‍याला सिंचनाचे हक्काचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी या योजनेतून सिंचन विहीर खुदाईसाठी मंजुरी व साधसामुग्रीसाठी निधी मिळतो. 2 लाख 75 हजार रुपयांपर्यंतची रक्कम याद्वारे शेतकर्‍याला मिळते. यामध्ये रोजगार हमीच्या कामातील कामगारांची मजुरी, यांत्रिकीकरणाने करावयाची कामे व बांधकाम यासाठी ही रक्कम दिली जाते. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात अडचणी वाढतच आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 2015-16 सालासाठी 500 सिंचन विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ 68 विहिरींना मंजुरी मिळाली. 2016-17 सालासाठी 600 विहिरींचे उद्दिष्ट होते, त्यापैकी केवळ 49 विहिरींना मंजुरी मिळाली. 2017-18 सालासाठी 600 विहिरींचे उद्दिष्ट होते त्यापैकी 81 सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात विहिरींचे उद्दिष्ट काही टक्केच पूर्ण होत आहे. 

सिंचन विहिरींसाठी शेतकर्‍यांची मागणी आहे. मात्र, यासाठीच्या निकषात शेतकरी पात्र ठरत नाहीत. शेतीचे सलग क्षेत्र 60 गुंठे असावे लागते. सार्वजनिक पाण्याच्या स्रोतापासून 500 मीटर व तकर्‍याच्या विहिरीपासून 150 मीटर अंतर असावे लागते. सध्या शेतीचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे.  रोजगार हमीच्या कामासाठी जिल्ह्यात 1 लाख 40 हजार जणांनी जॉबकार्ड काढले आहे. या योजनेत मजुराला दिवसाला 201 रुपये मजुरी मिळते. शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीत, शेतमजुरीसाठी काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक मजुरी मिळते. ऊस उत्पादन, साखर कारखानदारी, दुग्धोत्पादनाद्वारे दर दहा दिवसाला मिळणारे पैसे, उत्पन्नाच्या इतर साधनांमुळे मजुरांनी रोजगार हमीकडे पाठ फिरवली आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर अनेक ठिकाणी योजनेच्या अंमलबजावणीत उदासीनता आहे. यामुळे सिंचन विहिरींची कामे संथगतीने होत आहेत.