होमपेज › Kolhapur › सावधान... उद्धट वर्तन होणार कॅमेर्‍यात कैद

सावधान... उद्धट वर्तन होणार कॅमेर्‍यात कैद

Published On: Dec 30 2017 1:48AM | Last Updated: Dec 30 2017 1:36AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

वाहनधारकांनो सावधान... वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्यास प्रकरण नेमके अंगलट येणार आहे. वाहतूक पोलिसांच्या शर्टच्या बटनाला अत्याधुनिक कॅमेरा बसविण्यात आल्याने तुमच्या सार्‍या हालचाली टिपल्या जाणार आहेत. उद्धट वर्तन त्यांच्या कॅमेर्‍यात कैद होणार आहे. शहर वाहतूक शाखेकडे शुक्रवारी दहा कॅमेरे प्राप्त झाले आहेत.  शनिवारपासून त्याचे ट्रायल घेण्यात येत आहे.  ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्‍वभूमीवर ही उपाययोजना महत्त्वाची ठरणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. क्राईम बैठकीनंतर मोहिते यांनी या उपक्रमाची माहिती दिली.  शहरातील वाहतुकीची कोंडी आणि वाहनांची अफाट संख्या पाहता शहर वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे अवघड बनले आहे.

वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला तरी काही वाहनधारकांच्या अरेरावीला वाहतूक पोलिसांना तोंड द्यावे लागते. गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचे किमान सात-आठ घटना घडल्या आहेत. उमा टॉकीजसमोरील चौकात दोन पोलिसांवर हल्ल्याचेही प्रयत्न झाले होते. अशा घटनांमुळे वाद-विवादाचे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यात दावे-प्रतिदाव्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांचीही चांगलीच पंचाईत होत असे. वादविवादाच्या घटना टाळण्यासाठी किंबहुना वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस अधीक्षक मोहिते, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पोलिसांसाठी सुक्ष्म कॅमेरे खरेदी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला.

त्यास तत्त्वत: मान्यता मिळाली.  येथील दसरा चौक, सीपीआर कोपरा, ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, उमा टाकीज आदी महत्त्वाच्या, गजबजलेल्या ठिकाणी नियुक्त पोलिसांकडे हे कॅमेरे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरात प्रथमच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.