Sun, Jul 21, 2019 07:47होमपेज › Kolhapur › तरुणांनी केला स्वखर्चातून रस्ता

पालिकेला चपराक; 'थर्टी फर्स्ट'च्या खर्चातून केला रस्ता!

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 1:33AM

बुकमार्क करा
 कोल्हापूर : प्रतिनिधी

सामाजिक हेतूने चारचौघं एकत्र येऊन जर ठरवलचं तर अवघड गोष्टही सहजपणे साकारण्याची जिद्द काही विलक्षणचं...पार चाळण झालेल्या अन् महिला, चिमुरड्यांच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या यादवनगरातील धोकादायक रस्त्यासाठी ‘थर्टी फर्स्ट’वरील खर्चाला फाटा देऊन तरुणांनी निधी उभारला अन् जीवघेण्या रस्त्याचे श्रमदानातून‘पॅचवर्क’केले.   गोेखले कॉलेज चौक ते यादवनगर रस्ता... रात्रंदिवस वर्दळीचा... पावसाळ्यात रस्त्याची पार दुर्दशा झाली होती. खोलवर खड्ड्यांमुळे रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. पावसाळा संपला. पण रस्ता अजूनही उपेक्षित राहिला. धोकादायक  रस्त्याची डागडुजी पालिका प्रशासनाला निकालात काढता आली नाही. 

काही दिवसांपूर्वी रिक्षातून जाणार्‍या गर्भवतीलाही खड्ड्यांमुळे मोठी झळ सोसावी लागली. (दि.17 डिसेंबर) तोल जाऊन खड्ड्यात पडल्याने वृद्धा जायबंदी झाली. यादवनगरातील सर्वच युवा मंडळांनी प्रशासनाचे रस्त्याच्या डागडुजीकडे महापालिकेचे लक्ष वेधले होते; पण पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मंगळवारी (दि.27) सकाळी चिमुरडी मुलगी जखमी झाली. तासानंतर दुसर्‍या एका घटनेत दुचाकीवरील महिला आदळली. त्यानंतर मात्र सर्वच युवा मंडळांचे तरुण एकत्रित जमले. लोकवर्गणीतून रस्त्या दुरुस्तीचा निर्णय झाला. राजश्री शाहू तरुण मंडळ, अर्जुन ग्रुप, एकत्र तरुण मंडळ, चॉईस मित्र मंडळ, आमसाई मित्र मंडळ, फुटबॉल बॉईज, सरकार ग्रुपसह अन्य मंडळांतील कार्यकर्ते बुधवारी सकाळी मंदिराजवळ जमले. सार्‍यांनी ‘थर्टीफर्स्ट’चा बेत रद्दचा निर्धार केला. अवघ्या काही काळात मोठी रक्कम जमा केली.

स्वप्निल गायकवाडने दहा पोती सिमेंट दिले. काहींनी वाळू, खडी, खोरे, पाट्या स्वत: पोहोच केल्या. अनेकांनी खोरे, पाट्या, थापी हाती घेऊन श्रमदानाने रस्त्याचा भराव केला. साडेतीन तासांत सारा रस्ता चकचकीत करण्याची किमया तरुणांनी साधली.