Sun, Oct 20, 2019 01:08होमपेज › Kolhapur › वाहनांच्या वेगावर वीज खजूरचे शुगर फ्री चॉकलेट

वाहनांच्या वेगावर वीज खजूरचे शुगर फ्री चॉकलेट

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 12:38AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

 आविष्कार संशोधन महोत्सव नवनिर्मितीची प्रयोगशाळा असून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ देण्याचे काम या माध्यमातून होते, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठात विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.  प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विज्ञानासह सर्वच विषयांत उत्तम संशोधन करता येते, याची प्रचिती आविष्कार संशोधन महोत्सवामधून आली. विद्यार्थ्यांनी आता राहुरी येथील राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेपुरता विचार न करता गुजरात येथे होणार्‍या राष्ट्रीय संशोधन महोत्सवासाठीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यापीठाच्या लोककला केंद्रामध्ये आविष्कार महोत्सवाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे  संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील, महोत्सवाचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ. पी. एस. पाटील, डॉ. डी. टी. डोंगळे आदी उपस्थित होते. महोत्सवात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हानिहाय तसेच विद्यापीठांतर्गत झालेल्या आविष्कार महोत्सवातील प्रत्येक गटामधून निवडलेल्या तीन विजेत्यांना त्यांचे संशोधन प्रदर्शित करण्याची संधी देण्यात आली. 

स्पर्धेचा निकाल गटनिहाय असा : मानव्यशास्त्र, भाषा, ललित कला, शिक्षण शास्त्र- दामिनी मधुकर साळुंखे (कन्या महाविद्यालय, मिरज), वाणिज्य, व्यवस्थापन, विधी- प्रियांका मदनलाल पुरोहित (विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर), पदार्थ विज्ञान- शौफिक बाळू मुल्लाणी (न्यू कॉलेज, कोल्हापूर), शेती आणि पशुसंवर्धन- सोहनकुमार कलागिरी (राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर), अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान- यश विजय आंबले (न्यू कॉलेज, कोल्हापूर), वैद्यकीय आणि फार्मसी- संभाजी राघाप्पा मासाल (भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर). राज्यस्तरीय महोत्सवात सहभाग प्रत्येक गटातील एका विजेत्याला राज्यस्तरीय आविष्कार  महोत्सवामध्ये सहभागी होता येणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात दि.15 ते 17 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय महोत्सव होणार आहे.

महोत्सवात विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन तसेच विविध प्रकल्पांच्या प्रतिकृती सादर केल्या. न्यू कॉलेजमधील यश आंबोळे याने महामार्गावरील वाहनांच्या वेगावर वीज निर्मितीचे संशोधन सादर केले.  काळे खजूर वापरून शुगर फ्री चॉकलेट, सायबर इन्स्टिट्यूटमधील नम्रता विभुते हिने कलिंगडच्या बियांपासून केक, उसाच्या चिपाडापासून होणारे फायदे, जास्वंदाच्या फुलांपासून आयुर्वेदिक औषध निर्मिती, डाळिंबाच्या सालीपासून वस्त्रोद्योगासाठी लागणारा रंग, कर्‍हाडच्या  एसजेएम कॉलेजच्या रुचिता चव्हाण हिने पाण्यामध्ये मिसळलेले तेल वेगळे करणे, तसेच ऋतुजा थोरात हिने रद्दीपासून इथेनॉल निर्मितीचे संशोधन सादर केले. मिरजेच्या कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनीने वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांवर संशोधन करून एका महत्त्वाच्या सामाजिक विषयावर प्रकाशझोत टाकला. अशा विविध गटांमधून निवडलेल्या विद्यार्थ्यांना दि. 9 ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये विद्यापीठामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.