Thu, Jul 18, 2019 06:04होमपेज › Kolhapur › कोट्यवधी खर्चूनही खासबाग ‘जैसे थे’!

कोट्यवधी खर्चूनही खासबाग ‘जैसे थे’!

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:19PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सागर यादव 

कोट्यवधी रुपये खर्चूनही राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या दुरवस्थेत फारसा फरक न पडल्याने त्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. सध्या मैदानात सुरू असणार्‍या ‘महापौर चषक’ कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मनपा प्रशासनाने खासबाग मैदानाच्या दुरवस्थेची माहिती घेऊन त्याच्या डागडुजी व दुरवस्थेबाबत तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी कुस्तीशौकीन व शाहूप्रेमींकडून होत आहे. कोट्यवधी खर्चून अनावश्यक कामे... कुस्ती मैदानासाठी कोट्यवधी खर्चून अनावश्यक कामे करण्यात आल्याचा आरोप कुस्तीशौकीन व शाहूप्रेमींकडून होत आहे.

तटबंदीच्या दर्जा नुसत्या सिमेंटने भरल्या आहेत. आखाड्याभोवती पूर्वी असणारा लाकडी कठडा काढून तेथे दगडी कठडा बांधला आहे. यामुळे आखाड्यात कुस्ती करण्याच्या नादात मल्ल या दगडी कठड्यावर जाऊन आदळतात यामुळे त्यांना अनेकदा गंभीर दुखापती झाल्या आहेत, होत आहेत. मैदान विकसित करताना चेंजिंग रूम, पाणी आदी मूलभूत सुविधांचाही अभाव  आहे. मैदानात या गोष्टी होणे अत्यावश्क... खासबाग मैदानाचे सुशोभिकरण करण्यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील ज्येष्ठ व तज्ज्ञ अभ्यासकांच्या सूचना घेण्यात आल्या होत्या.

मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. यामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे. केवळ कुस्ती स्पर्धांपुरते मैदान खुले न राहता वर्षभर ते शाहूप्रेमी, इतिहास व खेळ अभ्यासक आणि पर्यटकांसाठी खुले रहावे. याकरिता मनपाच्यावतीने कुस्तीसम्राट युवराज पाटील यांच्या वतीने येथे कायमस्वरूपी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करावे.  येथे कुस्ती, मल्लखांब यासह मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात यावे. कोल्हापूरची कुस्ती परंपरा, खासबागेचे वैशिष्ट्य आणि राजर्षी शाहूंचा इतिहास सांगणारे माहिती केंद्र येथे निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत  आहे.