Fri, May 29, 2020 08:18होमपेज › Kolhapur › मालमत्तेच्या वादात मुलाने रिव्हॉल्व्हर रोखले

मालमत्तेच्या वादात मुलाने रिव्हॉल्व्हर रोखले

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 27 2017 1:15AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मालमत्तेच्या वादातून मुलाने चुलत चुलत्यावर रिव्हॉल्व्हर रोखून तर अन्य चारजणांनी सख्ख्या भावांना लाथ्याबुक्यांनी मारहाण केल्याची घटना नागाळा पार्क येथील महावीर गार्डनसमोर घडली. याप्रकरणी अल्पवयीन संशयित मुलासह पाचजणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. संशयितात दोन महिलांचा समावेश आहे. 14 वर्षीय मुलासह अर्जुनसिंह प्रेमसिंग परदेशी (वय 28), विजयसिंग बलदेवसिंग परदेशी (45), ऐश्‍वर्या विजयसिंग परदेशी (44), ललिता प्रेमसिंग परदेशी (50, रा. महावीर गार्डनसमोर नागाळा पार्क) अशी त्यांची नावे आहेत. श्रीमती निर्मला जवाहरलाल परदेशी (वय 75) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

मुलगा दलबिरसिंग व उदयसिंग यांना मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दि.24 डिसेंबरला रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. फिर्यादी निर्मला व विजयसिंग परदेशी यांच्यात मालमत्तेच्या कारणातून मतभेद निर्माण झाले आहेत. यापूर्वीही त्यांच्यात वारंवार वादावादी होत असत. शनिवारी रात्री याच कारणातून त्यांच्यात वादावादी झाली. हाणामारीत त्याचे पर्यावसान झाले. अल्पवयीन मुलाने दलबिरसिंग, उदयसिंगवर रिव्हॉल्व्हर रोखून दहशत माजविली. तर इतरांनी लाथा-बुक्यांनी मारहाण केली. शिवाय शिवीगाळही करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. दरम्यान, श्रीमती परदेशी व त्यांच्या विवाहित मुलींनी दुपारी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन या प्रकाराकडे त्यांचे लक्ष वेधले. मोहिते यांनी घटनेची चौकशी करून संशयितांवर कारवाईसाठी शाहूपुरी पोलिसांना सूचना केल्या.