Sat, Jul 20, 2019 02:13होमपेज › Kolhapur › भाजपची घोडदौड काँग्रेस रुळावर अन् स्वाभिमानी ला खिंडार

भाजपची घोडदौड काँग्रेस रुळावर अन् स्वाभिमानी ला खिंडार

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 11:00PM

बुकमार्क करा

कोल्हापूर ः विठ्ठल पाटील

राजकीय रणधुमाळीत जिल्हा परिषदेपाठोपाठ भाजपने नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत यश संपादन करीत जिल्ह्यात घोडदौड कायम ठेवली. सहकारी साखर कारखानदारीतही प्रवेश केला. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असणार्‍या भाजपबरोबरच्या घटकपक्ष शिवसेनेने आपले गड शाबूत ठेवले. गेली तीन वर्षे मान टाकलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते अलीकडे सक्रिय झाले आहेत. दोन नेत्यांतच बेबनाव होत खिंडार पडल्याने यंदा सर्वात मोठा धक्का बसला तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेला. 

गल्ली ते दिल्ली असे बोलले जात असले, तरी भाजपने मात्र दिल्ली ते गल्ली पादाक्रांत करीत कोल्हापुरात आपला झेंडा फडकावला. केेंद्रातील सत्तेपाठोपाठ राज्यात सत्ता मिळविलेल्या भाजपचे नेते महसूल, सार्वजनिक बांधकामबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट कोणाला अंगावर न घेता पक्षवाढीचा अजेंडा यशस्वी केला. महापालिकेची सत्ता अवघ्या काही फरकाने निसटलेली असताना, त्याचा वचपा त्यांनी जिल्हा परिषदेपाठोपाठ नगरपालिकांच्या निवडणुकीत काढला. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबरोबरच दहापैकी पाच नगरपरिषदांचे अध्यक्षपद पटकावले. पाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकांतही आघाडी घेतली. थेट सरपंच निवडीतून 128 सरपंचपदे,   884 सदस्य भाजपने निवडून आणले. पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावरून आ. हसन मुश्रीफ यांच्याबरोबर खटके उडाले; पण काही दिवसांतच ते मिटवत मोठ्या मुत्सद्देगिरीने ना. पाटील यांनी बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांना आपलेसे केले. जिल्ह्यातील एक मोठा विरोधक या कारखान्याच्या माध्यमातून आपल्याकडे वळवून काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही धक्का दिला. कोणावरही व्यक्तिगत टीका करायची नाही, हे धोरण अवलंबत थेट विरोध पत्करून लढत बसण्यापेक्षा बेरजेचे राजकारण करीत ना. पाटील यांनी  जिल्ह्यात पक्षाचा जम बसविला. गडहिंग्लज, आजरापाठोपाठ बिद्री साखर कारखान्याच्या सत्तेत भाजप विराजमान झाला आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कोल्हापूर दौर्‍यावर असताना खा. शेट्टी यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे भविष्यात शेट्टींना काँग्रेसचा पाठिंबा मिळेल काय? अशी शक्यता वर्तविली जात आहे. मंत्री सदाभाऊ खोत आणि खा. शेट्टी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. त्यातून खोत यांना अनेक विशेषने जोडत त्यांची हकालपट्टी केली. मंत्रिपद काढून घेण्याबाबत भाजपला कळविले; पण भाजपने आपल्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद कायम राहील, असे घोषित केले आणि तेथूनच शेट्टी यांनी भाजपबरोबर फारकत घेतली. खा. शेट्टी यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी काँग्रेसने डाव टाकला आहे.
वर्षअखेरीच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौरे झाले. प्रत्येकाने आपापल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीचे नेते आ. मुश्रीफ यांनी पक्षावर पकड कायम ठेवत नेते आणि कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यात यश मिळविले. तो प्रकार काँग्रेसच्या बाबतीत घडला नाही. माजी आमदार महाडिक पक्षाबरोबर नाहीत. आवाडे संदिग्ध होते. तर आ. सतेज पाटील व पी. एन. पाटील यांच्यात एकवाक्यता नव्हती. महाडिक वगळता आता सर्वजण सक्रिय झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे  जिल्ह्यात सहा आमदार आहेत. उद्धव ठाकरे जिल्ह्यातील एका आमदाराला मंत्रिपद जाहीर करतील, असे वाटले होते. मात्र, ठाकरे यांच्या दौर्‍यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. फडणवीस यांनी शाहू सहकारी साखर कारखाना आणि विक्रमसिंह घाटगे बँकेच्या नामकरण सोहळ्यास उपस्थिती लावत समरजितसिंह घाटगे यांच्या गटाला उभारी दिली. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या बालेकिल्ल्यात वारणानगरला कार्यक्रम घेत विनय कोरे यांचीही ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे. त्यामुळे भविष्यात कोणाची कोणती चाल राहणार, हेच महत्त्वाचे ठरणार आहे.