Sun, Nov 18, 2018 13:27होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय गरजेचे

कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय गरजेचे

Published On: Jan 19 2018 1:51AM | Last Updated: Jan 19 2018 12:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या नागरीकरणात दहा वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी भविष्यात कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय होणे गरजेचे आहे; मात्र हा निर्णय शासनस्तरावर अवलंबून आहे, असे अप्पर पोलिस महासंचालक (प्रशासन) डी. कनकरत्नम यांनी गुरुवारी सांगितले. कोल्हापूर पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी ते आजपासून तीन दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत. सकाळी त्यांचे आगमन झाले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी स्वागत केले.

अप्पर पोलिस महासंचालकांनी पोलिस मुख्यालयातील कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर दुपारी ते इचलकरंजीला रवाना झाले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याची तपासणी झाली. सायंकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचा आढावा घेण्यात आला.

डी. कनकरत्नम म्हणाले, 1991 मध्ये अप्पर पोलिस अधीक्षकपदावर कोल्हापुरात काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीची माहिती आहे. कोल्हापूर, इंचलकरंजी परिसराचा कायापालट झाल्याचे दिसून आले. नागरीकरणासह उद्योगधंद्यांचीही वाढ झाली आहे. 

ते म्हणाले, पोलिस दलाच्या चोख कामगिरीमुळे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात नक्षली कारवायांनाही आळा बसला आहे. अप्पर पोलिस महासंचालकांच्या उपस्थितीत उद्या (शुक्रवारी) दुपारी जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांची पोलिस मुख्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेसह सराईत गुन्हेगारी टोळ्यांवरील प्रतिबंधात्मक कारवाईचा बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, डॉ. प्रशांत अमृतकर, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक सई भोरे-पाटील, पोलिस निरीक्षक अनिल गुजर, तानाजी सावंत, संजय मोरे, दिलीप जाधव आदी उपस्थित होते.