होमपेज › Kolhapur › पिरजादे, चव्हाण यांना काळे फासणार

पिरजादे, चव्हाण यांना काळे फासणार

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 1:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सोमवारी झालेल्या महानगरपालिका स्थायी सभापती निवडीत  राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराणा प्रताप चौकात सोमवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली.  दरम्यान, सोमवारी रात्रीपासून पिरजादे व चव्हाण यांच्या घराजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, तातडीने झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत  पिरजादे आणि चव्हाण यांचा निषेध करून त्यांना शहरात दिसतील तेथे काळे फासण्याचा आणि महिला आघाडीतर्फे बांगड्या आणि चोळीचा आहेर देण्याचा निर्धार करण्यात आला. राष्ट्रीय सरचिटणीस आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. 

आर. के. पोवार म्हणाले, पक्षाने या दोघांना मान-सन्मान दिला. स्थायी समिती सदस्यपद, वॉर्ड सभापती अशी महत्त्वाची पदे देऊनही केवळ पदासाठी नाही तर आर्थिक हव्यासापोटी या दोन्ही नगरसेवकांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. या दोघांवर पक्षातर्फे कारवाई केली जाणार आहेच. मात्र, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्यांच्या प्रभागात मोर्चा, जाहीर सभा, काळे फासणे आदी आंदोलन केले जाणार आहे. महिला आघाडीतर्फे दिसेल तेथे बांगड्यांचा आहेर दिला जाईल. स्थायी सभा, सर्वसाधारण सभेसह कोल्हापुरात दिसेल तेथे त्यांना काळे फासण्यात येईल. अजिंक्य चव्हाण यांच्या विरोधात शिवाजी पेठेत मंडप घालून सभा घेऊन निषेध  करू.

शहराध्यक्ष राजू लाटकर म्हणाले, स्थायी सभापती पद आपल्याच नगरसेवकांनी हिरावून घेतले आहे.  हा भिकारडेपणा आर्थिक लाभासाठी केला आहे. निवडणुकीत पक्ष तुमच्या दारात आला नव्हता. तिकीट मागण्यास तुम्ही पक्षाकडे आला होता. हिम्मत असेल तर राजीनामा द्या, निवडून या, मग पदाचा बाजार करा. पार्टी विथ डिफ्रंटस् म्हणणार्‍या भाजपने पुन्हा घोडेबाजार सुरू केला आहे.  या प्रकरणात पैसे कुठून आले याचा शोध लाचलुचपत विभागाने घ्यावा. या प्रकरणामुळे शिवाजी पेठेसह सपूर्ण शहराचा स्वाभिमान दुखावला आहे. दोघांनी स्थायी समितीत जाताना कुणाला पैसे दिले होते का? मग आता  तुम्ही पैशाची मागणी कशी करता? असा संतप्‍त सवाल लाटकर यांनी केला. महापालिकेतच नाही तर शहरात फिरू देणार नाही.

दिसेल तेथे काळे  फासणे, अंगावर शेण टाकणे असे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शिवसेना सदस्य प्रामाणिक राहिल्याबद्दल शिवसेनेचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. नगरसेवक मुरलीधर जाधव म्हणाले, या दोन्ही नगरसेवकांवर मुश्रीफ साहेबांचा विश्‍वास होता. ते दोघे सोमवारी सकाळपर्यंत आमच्यासोबत होते. नाष्टा एकत्र घेतला आणि केवळ  एका तासात गद्दारी केली. या दोघांनाही सभागृहातून हाकलून देण्याचे काम करूया. उत्तम कोराणे म्हणाले, अजिंक्यला शिवाजी पेठेत कोणी ओळखतही नव्हते. राष्ट्रवादीने आम्हा कार्यकर्त्यांच्या बळावर  त्याला ताकद दिली. मात्र, त्याने धोका दिला. अजिंक्य आमचा पाव्हणा,  भाऊ आहे; पण सांगायला लाज वाटते असे कृत्य त्याने केले आहे. त्याच्या घरासमोर आंदोलनात मी स्वत: अग्रेसर राहणार आहे. पक्षाशी गद्दारी करून दीड कोटी रुपये घेतले आहेत. मात्र,  हा पैसा पचणार नाही. 

आदील फरास म्हणाले, मेघा पाटील यांच्या रूपाने एका महिलेला संधी देण्यात येत होती. मात्र, पक्षातील सूर्याजी पिसाळांनी हा घोळ केला. त्यांच्यावर पक्षाने कडक कारवाई करावी. तसेच या व्यवहारात  पैसा कुठून आला याची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करावी. यावेळी अनिल कदम, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, शितल तिवडे, सुनील देसाई यांची भाषणे झाली. बैठकीस उपमहापौर सुनील पाटील, सुनीता राऊत, रमेश पोवार, बाबा सरकवास, विनायक फाळके, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.