Sat, Aug 24, 2019 21:27होमपेज › Kolhapur › ‘फुलेवाडी’ची ‘खंडोबा’वर मात

‘फुलेवाडी’ची ‘खंडोबा’वर मात

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 1:45AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

खंडोबा तालीम मंडळावर 2-1 अशा गोलफरकाने विजय मिळवत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने ‘केएसए लिग’ फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे.  मंगळवारी हजारो फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत सामना रंगला. दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळ झाला. फुलेवाडी संघाने गोलसाठी जोरदार चढायांचा अवलंब केला. रोहित मंडलिक, मंगेश दिवसे, अक्षय मंडलिक, केनचॉर, सूरज शिंगटे, सिद्धेश यादव यांनी आघाडीसाठी प्रयत्न चालविले. तिसर्‍या मिनिटाच्या जोरदार चढाईत रोहित मंडलिकच्या पासवर सूरज शिंगटेने गोल नोंदवत आघाडी मिळविली. 28 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत अक्षय मंडलिकच्या पासवर शुभम साळोखेने गोल नोंदवत आघाडी 2-0 अशी भक्कम केली. 

आघाडी कमी करण्यासाठी खंडोबाकडून जोरदार प्रयत्न झाले. सुधीर कोटीकेला, अर्जुन शेतगावकर, रणवीर जाधव, प्रतिक सावंत, आशिष चव्हाण यांनी लागोपाठ चढाया केल्या. 33 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत खंडोबाच्या सिद्धार्थ शिंदे याने मारलेला चेंडू फुलेवाडीच्या उमेश भगतच्या डोक्याला लागून गोलपोस्टमध्ये घुसल्याने स्वयंगोल झाल्याने फुलेवाडीची आघाडी कमी झाली. फुलेवाडी 2-1 अशी आघाडी होती. उत्तरार्धात खंडोबाकडून उर्वरित गोल फेडण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, फुलेवाडीच्या भक्कम बचावापुढे ते अपयशी ठरले.