Tue, Jul 23, 2019 10:33होमपेज › Kolhapur › शहरात १२ हजार फेरीवाले; जागा मात्र ८ हजारांसाठीच उपलब्ध

शहरात १२ हजार फेरीवाले; जागा मात्र ८ हजारांसाठीच उपलब्ध

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 11:25PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केल्यानंतर कायदेशीर, बेकायदेशीर व वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या फेरीवाल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे; पण शहरात उपलब्ध असलेल्या जागेचा विचार करता 8 हजार फेरीवाले बसतील एवढीच जागा उपलब्ध आहे, त्यामुळे 4 हजार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावयाचे कोठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामुळे फेरीवाल्यांनीच सबुरीने घेऊन व्यवसाय करावा, अशी अपेक्षा मेळाव्यात करण्यात  आली. 

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचे कायमचे नियोजन करण्यासाठी महापालिकेत आयुक्तांशी अनेक बैठका झाल्या. त्यानंतर शहरातील उपलब्ध जागेचा आणि फेरीवाले किती आहेत, याचा खासगी कंपनीमार्फत सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये 12 हजारांवर फेरीवाले असल्याचे आढळून आले. तसेच 7 ते 8 हजार फेरीवाले बसू शकतील एवढी जागा शहरात आहे. त्यामुळे 4 हजारांवरील फेरीवाल्यांचे पुनर्वसन कसे करावयाचे आणि त्यांना जागा कशी उपलब्ध करून द्यावयाची, असाही प्रश्‍न आहे. बायोमेट्रिक कार्ड काढण्यासाठी 6 हजार फेरीवाल्यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर 3,200 फेरीवाल्यांना कार्डे दिली आहेत.

1,200 केबिनधारक आहेत; पण त्यातील 850 केबिनधारक बेकायदेशीर आहेत, असे आर. के.पोवार यांनी मेळाव्यात सांगितले. एक लाख रुपये खर्च करून सलून दुकानदाराने केबिन घातली आहे. तोही आपण फेरीवाला असल्याचे म्हणत आहे, त्यामुळे फेरीवाले कोण याचाही नियम ठरला पाहिजे, अशी अपेक्षाही आर. के. पोवार यांनी व्यक्त  केली.  फक्त फेरीवाल्यांना हटवावयाचे आणि ती जागा व्यापार्‍याला द्यावयाची, हे अन्यायकारक आहे. यासाठी महापालिकेने त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. फेरीवाल्यांना ज्यावेळी बायोमेट्रिक कार्डे देण्यात आली. त्यावेळी अनधिकृत आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या केबिन्सधारकांकडे बायोमेट्रिक कार्डे मिळाली, अशा कार्डांची महापालिकेत तपासणी केली असता बोगस बायोमेट्रिक कार्ड असल्याचे आढळून आले. हा प्रामाणिक फेरीवाल्यांवर अन्याय असून, महापालिकेने त्याचा शोध घेऊन कारवाईबाबतचा निर्णय घ्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.