Thu, Apr 25, 2019 22:08होमपेज › Kolhapur › पीक नुकसानीचे पंचनामे होणार सुपरफास्ट

पीक नुकसानीचे पंचनामे होणार सुपरफास्ट

Published On: Feb 03 2018 2:21AM | Last Updated: Feb 03 2018 12:04AMकोल्हापूर : विजय पाटील 

दुष्काळ पडल्याने ऊस वाळला. अतिवृष्टी झाल्याने हाततोंडाला आलेलं भातपीक भुईसपाट झालं. असं चित्र दोन-चार वर्षांतून हमखास  दिसतं. द्राक्षं, आंबा, काजू, संत्री आदी पिकांनाही वादळ-वार्‍याचा तडाखा बसला की बळीराजा कोलमडून पडतो. या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यात वशिलेबाजी होत असल्याच्या सतत तक्रारी येतात. यामुळे वाद होतात. आता मात्र डिजिटल हवामान केंद्र कार्यरत होणार असल्याने अशा पिकांचे पंचनामे सुपरफास्ट होणार आहेत.  प्रत्येक महसूल मंडळासाठी डिजिटल  हवामान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. आधुनिक पद्धतीच्या या हवामान केंद्रामुळे कुणालाही  मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून स्थानिक हवामानाची माहिती क्षणभरात मिळणार आहे. याचा फायदा शेतकर्‍यांना पीकपद्धतीसाठी होणार हे स्पष्ट आहे.

यासह जर अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अतिथंडी आदींमुळे पिकांचे नुकसान झाले तर यासाठी दिली जाणारी नुकसान भरपाईसुद्धा जलद आणि योग्य मिळणार आहे. कारण यापूर्वी पिकांचे पंचनामे करताना सरकारी कर्मचार्‍यांचा किंवा राजकीय नेत्यांचा थेट हस्तक्षेप होत होता. त्यामुळे कागदे जशी रंगतील त्या पद्धतीने भरपाई किंवा अनुदानाचे वाटप होत होते. आता मात्र प्रत्येक दहा किलोमीटर परिसरातील हवामानाची अचूक नोंद नव्या हवामान केंद्रामुळे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणत्या परिसरात किती पाऊस पडला किंवा अतिथंडी पडली हे नोंदीवरून दिसून येईल. त्याप्रमाणात नुकसानीचे आकडे निश्‍चित  होतील. 

तसेच वेगवेगेळ्या पिकासाठी हवामानावर  आधारित पीक विमा योजना आहेत. नुकसान झाल्यास विम्याची रक्‍कम देताना कंपन्या त्रुटी काढून आढेवेढे घेतात. याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. बळीराजा कर्जबाजारी होतो. आधुनिक हवामान केंद्रांमुळे किमान मानवी हस्तक्षेप होणार नाही. त्यामुळे अचूक पंचनामे आणि नुकसानभरपाई दिली जाईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आंबा, काजू संत्री, थंडीची लाट आली तर 18 अंश सेल्सिअस तापमान गेले तर नुकसान पात्र हमखास नुकसानभरपाई मिळते. द्राक्षे गारपीट, अवेळी पाऊस पडल्यास नुकसान होते. नियमित पाऊस अवेळी पडला तर हवामान केंद्रात नोंद झाल्यास कंपनीलासुद्धा पीकविमा नाकारता येणार नाही. अतिवृष्टी झाल्यास काही भागात नुकसान होते. आता ते काटेकोरपणे होणार आहे. पंचनामे नैसर्गिक आपत्तीमुळे पीक कापणीला आल्यास वाया जातो. 

आधुनिक हवामान केंद्र 

 महावेध आणि स्कायमेट या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक दहा किलोमीटरच्या परिघात आधुनिक हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत.  प्रत्येक महसुल मंडळ हे यासाठी अंतर निश्‍चित करण्यात आले आहे. ही  अ‍ॅटोमेटीक यंत्रणा असल्याने तात्काळ सर्वच शासकिय केंद्रांना हा डाटा मिळणार आहे. कंपनीने तयार केलेले मोबाईल अ‍ॅप कोणीही डाऊनलोड करुन ही माहिती मिळवू शकणार आहे. मार्चनंतर ही सुविधा सर्वत्र उपलब्ध होईल असे कृषी अधिका-यांकडून सांगण्यात आले.